वाघोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीला आपले सरकार सेवा केंद्र’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला असून तो दि.२८-०४-२०१५ पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायत क्षेत्रामधील नागरिक व विद्यार्थ्यांचे शासकीय दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी या केंद्राचा उपयोग आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील नागरिक व विद्यार्थ्यांचे शासकीय दाखले सहजतेने उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्वाक्षरीचे सेवा केंद्राचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली केसवड,उपसरपंच स्वाती इंगळे, मोनाली भोर,संदिप गावडे,नंदकुमार भोर, गणेश भोरडे, सुमीत शिंदे,किर्ती पायगुडे,सोनाली रिकामे, सोनाली शिंदे, संतोष चव्हाण, संध्या गावडे, विजय पायगुडे, ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.