Wagholi News : वाघोलीत रंगणार भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतींचा थरार

वाघोली : वाघोली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव १२ व १३ फेब्रुवारी होणार असल्याने या उत्सवानिमित्त ९, १०, ११ व १४ फेब्रुवारीला भव्य भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन वाघोली ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. फायनलमधील एक नंबरसाठी महिंद्रा थार गाडी, दोन नंबरसाठी ट्रॅक्टर, तीन नंबरसाठी बुलेट गाडी असणार आहे. त्याचबरोबर स्प्लेंडर, फ्रीज, टीव्ही अशी बक्षिसे बैलगाडा विजेत्यांना असणार आहेत. यासह विजेत्या बैलगाड्यांवर लाखो रुपयांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
वाघोलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त २०१४ नंतर यंदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले असून बैलगाडा शर्यतीसाठी घाट उभारणीचे काम बाईफ रोड येथील फकीरबाबा वाडा येथे करण्यात येत आहे. घाटाच्या कामासाठी तसेच बैलगाडा शर्यतीकरिता आवश्यक मदत करण्यासाठी वाघोली ग्रामस्थ काम करीत आहेत. जवळपास पाच एकरामध्ये बैलगाडा घाट, पार्किंग व आवश्यक सेवा उभारण्याचे काम करण्यात येत आहे. बैलगाडा मालक, शौकीन यांच्याकरिता जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे.
बैलगाडा शर्यती ९, १०, ११ व १४ फेब्रुवारी या चार दिवशी होणार असून १४ फेब्रुवारीला फायनल होणार आहे. भैरवनाथ देवाचा उत्सव १२ व १३ फेब्रुवारीला असणार आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन भव्यदिव्य होणार असल्याने बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होऊन बक्षीस पटकावणाऱ्या विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव वाघोली ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी गाडा मालकांनी जोरदार तयारी सुरु केली असून वाघोली व परिसरामधील बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बुधवारी काढले जाणार टोकन
वाघोलीतील भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतींसाठी बुधवारी टोकन काढले जाणार असून वाघोलीतील वाघेश्वर मंदिर येथे सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढले जातील. बैलगाडा मालकांनी भव्य शर्यतींमध्ये सहभागी होऊन टोकन काढण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन वाघोली ग्रामस्थांनी केले आहे.
लाख मोलाच्या देणगीचाही आदर्श
माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील व माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथील रघुनाथ सोपानराव दाभाडे यांच्याकडून दोन लाख रुपये तर राजेंद्र सातव पाटील कुटुंबाकडून बैलगाडा घाटासाठी एक लाख रुपये देणगी देऊन अनोखा आदर्श उभा केला आहे.





