वाघोली – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलांना फोनवर त्रास देणारा, अश्लील शेरे बाजी करणारा आणि गॅलरीत अंडरवेअरवर उभा राहणारा आरोपी सिद्धेश्वर बिरादार (वय 30, रा. कोलवडी) याला पोलिसांनी 24 तासांत गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून शिक्षेची कारवाई केली. सोसायटीतील महिलांच्या तक्रारीनंतर 23 मार्च रोजी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा क्र. 167/2025 (BNS 78, 79, 115(2), 351(2), 352) नोंदवला होता. अवघ्या 24 तासांत तपास पूर्ण करून 25 मार्चला दोषारोप शिवाजीनगर कोर्टात सादर केले. त्वरित सुनावणी, शिक्षा – आज फिर्यादी आणि साक्षीदार कोर्टात हजर झाले. आरोपीने गुन्हा कबूल केल्याने न्यायालयाने 24 तासांतच सुनावणी पूर्ण करत सिद्धेश्वर बिरादार याला 10,000 रुपये दंड, कोर्ट उठेपर्यंत ताब्यात ठेवण्याची शिक्षा आणि फिर्यादीला 5,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. दंड न भरल्यास 11 दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असा निकालही सुनावला. पोलिसांची कामगिरी – या गुन्ह्याचा तपास डीसीपी झोन 4 हिम्मत जाधव, एसीपी प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया पंडित वंजारी यांनी केला. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल आशिष लोहार (PC 4296) आणि विठ्ठल केदारी (PC 2329) यांनी सहकार्य केलं. जलद तपास आणि कारवाईमुळे लोणीकंद पोलिसांचं कौतुक होत आहे.