वाघोली : इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत रिक्षाची सुविधा

वाघोली – केसनंद (ता. हवेली) येथील माजी सरपंच प्रमोद चंद्रकांत हरगुडे पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर जाता यावे या उद्देशाने बस आणि रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केसनंद आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी केंद्रावर वेळेवर जाता यावे या उद्देशाने जाणे आणि येण्याची मोफत व्यवस्था गेल्या सहा वर्षापासून केसनंद येथून परीक्षा केंद्रापर्यंत करण्यात येत असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गुलाब पुष्प व पेन देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून याप्रसंगी विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“माजी सरपंच प्रमोद हरगुडे यांनी गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ये-जा करण्यासाठी मोफत रिक्षा सुविधा उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.” -मिलिंद हरगुडे, (माजी सरपंच, केसनंद)





