Wagholi : अवैध धंद्यांच्या विरोधात नागरिक संतप्त; थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच मांडली कैफियत

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली (तालुका हवेली) येथील अवैध धंद्यांच्या त्रासामुळे महिला, मुली व नागरिक संतापले असून त्यांनी याबाबतची कैफियत खुद्द लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर मांडली आहे. त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघोली परिसरात असणाऱ्या अवैध धंद्याच्या विरोधातील कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाघोली केसनंद रस्त्यालगत कोणार्क प्लाझा येथील घुले वाईन शॉप समोर दारू पिणाऱ्या व्यक्तींमुळे कोणार्क एक्झोटीका सोसायटी, हिलशायर सोसायटी व इतर केसनंद रोड वरील सोसायटीमधील महिलांना, मुलींना,नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दारू पिणाऱ्या व्यक्तींनी या परिसरातील महिला व मुलींची छेड काढल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. याबाबत कोणार्क एक्झोटीका सोसायटी मधील महिला, नागरिक यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका पवार यांची भेट घेत त्यांना लेखी निवेदन देऊन महिला व मुलींसाठी हा परिसर सुरक्षित करून व दारू पिणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार केली आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/optical-illusion-only-3-can-find-frog-hidden-inside-girls-bedroom/
यानंतर त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाईचे आदेश कर्मचारी वर्गाला दिले आहे.वाघोली परिसरामध्ये राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत भाजपच्या वतीने लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले असून अवैध धंदे चालकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर लवकरच भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.





