वाघोली – महाराष्ट्र शासनाच्या “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना (बीजेएस) विद्यालयाने हवेली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय सुविधा, स्वच्छता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याने या शाळेला तीन लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. या अभियानात राज्यातील अनेक शाळांनी भाग घेतला होता. मूल्यांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत बीजेएस विद्यालयाने हे यश मिळवलं. विशेष म्हणजे, मागील वर्षीही या अभियानात शाळेने हवेलीत दुसरा क्रमांक मिळवला होता. प्राचार्य संतोष भंडारी म्हणाले, “दोन वर्षांत सातत्याने मिळालेलं यश हे सांघिक कार्याचं उत्तम उदाहरण आहे. या पुरस्काराने आम्हाला प्रोत्साहन मिळालं असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्तेचं उच्चतम मानक राखण्याचा आमचा प्रयत्न राहील.” शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही भविष्यातील उत्तम कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. बीजेएसचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था, प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, शाळा समितीचे अध्यक्ष अरुण नाहर आणि प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांनी प्राचार्य भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपटराव गेठे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन करत शाळेला शुभेच्छा दिल्या. या यशाने शाळेत आनंदाचं वातावरण आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे शालेय व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत. हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधराताई शिवदास उबाळे म्हणाल्या, “बीजेएस विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवून वाघोलीचा नावलौकिक वाढवला आहे. संस्था, व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन!” शाळेच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तर वाढलाच आहे, शिवाय शिक्षण क्षेत्रातील नव्या संधींचाही मार्ग मोकळा झाला आहे.