Wagholi Accident – वाघोली परिसरात झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर वाघोलीतील कटकेवाडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. वाघोलीतील केसनंद-कोलवडी रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमनाथ भगवान गायकवाड ( ४५, रा. कोलवडी, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ उत्तम (५४) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सोमनाथ गायकवाड हे २५ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास केसनंद-कोलवडी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करीत आहेत. वाघोलीतील कटकेवाडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवनाथ विष्णू मंजूळकर (२०, रा. गाडेवस्ती, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ याचे मामेभाऊ किशोर पंडित पवार (३४) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.