वाधवान यांचे कुटुंब तिसऱ्यांदा क्वारंटाइन
महाबळेश्वरातील बंगल्याबाहेर लावलेल्या पोलीस बंदोबस्ताबाबत प्रश्नचिन्ह

महाबळेश्वर – जिल्हा प्रशासनाने काल (दि. 23) महाबळेश्वरमधील “दिवाण व्हिला’मध्ये होम क्वारंटाइन केलेले उद्योगपती वाधवान व यांच्या कुटुंबावर सलग तिसऱ्यांदा क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. प्रथम लोणावळ्यात होम क्वारंटाइन, त्यानंतर पाचगणीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन व आता महाबळेश्वरात होम क्वारंटाइन, अशा पद्धतीने वाधवान कुटुंबाला प्रत्येकी चौदा दिवस क्वारंटाइन व्हावे लागले आहे. दरम्यान, वाधवान कुटुंबीय व नोकरचाकरांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाचगणीतून महाबळेश्वरात आणण्यात आले असून तो विषयही चर्चेचा ठरला आहे.
वाधवान कुटुंब मार्च महिन्यात होळीनिमित्त काही दिवस महाबळेश्वरमध्ये राहायला आले होते. त्यांनी रंगपंचमीपूर्वी म्हणजे 12 मार्चला महाबळेश्वर सोडले होते. या दरम्यान मुंबईत करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. वाधवान कुटुंबीय 20 मार्चला लोणावळ्याजवळच्या तुंगार्ली येथील पिकॉक व्हॅली सोसायटीत दाखल झाले होते. तेथे दोन बंगले त्यांनी काही दिवसांसाठी भाड्याने घेतले होते. दरम्यान, पुणे, मुंबईत दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालल्याने लोणावळा प्रशासनाने वाधवान कुटुंबीयांना होम क्वारंटाइन केले होते.
त्यानंतर गृह विभागाच्या विशेष सचिवांच्या पत्राच्या आधारे जिल्हाबंदी मोडून वाधवान कुटुंबीय 8 एप्रिल रोजी महाबळेश्वरला आले होते. याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी जिल्हा प्रशासनास कळविल्यानंतर वाधवान कुटुंबीयांना पाचगणीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. हा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर वाधवान कुटुंबीयांना काल (दि. 23) मोठ्या पोलीस बंदोबस्तात महाबळेश्वरला आणून पुढील चौदा दिवसांसाठी (5 मेपर्यंत) होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
वाधवान कुटुंबीयांना 20 मार्चपासून 5 मेपर्यंत एकूण तीन वेळा क्वारंटाइनमध्ये राहावे लागले आहे. त्यांना काल महाबळेश्वरला मोठ्या बंदोबस्तात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार, मुख्याधिकारी दगडे-पाटील, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, महसूल विभागाचे डझनभर कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, असा लवाजमा वाधवान कुटुंबीयांसोबत होता. त्यांच्यासाठी एवढ्या बंदोबस्ताची आवश्यकता होती का? वाधवान यांच्या बंगल्याबाहेर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वास्तविक वाधवान यांच्या बंगल्याचा परिसर मोठा आहे. जेथे पोलीस आहेत, तेथून बंगलाही दिसत नाही. मग, मागील बाजूने कोणी बाहेर पडले तरी दिसणार नाही. त्यामुळे या बंदोबस्तातून काय साध्य होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.





