प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट तर्फे दिला जाणारा मध्य विभाग तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार यंदा कासारसाई तील श्री संत तुकाराम सह. साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सोमवारी( दि.२९) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु. येथे व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहीती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस जी पठारे यांनी दिली.कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांचे मार्गदर्शनाखाली गेली २७ वर्ष कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. मागील गळीत हंगामात कारखान्याने ४०३१५६ मे टन ऊसाचे गाळप केलेले आहे व ४६५२०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के मिळालेला आहे.मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक ८५.१५ टक्के रिड्यूस्डमिल एक्स्टेंक्शन ९६.२७, बगॅसमधील आद्रतेचे प्रमाण ४८.३२ टक्के बगॅसमधील साखरेच्या व्येयाचे प्रमाण ०.५१, वीज विक्री प्रती टन ऊस ६६.८३ KW/Ton, प्रायमरी एक्सट्रॅक्शन ७३.७१, साखर उतारा ११.५४ टक्के, मागील वर्षाच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ ७.९४ टक्के, गाळप क्षमतेच्या वापराचे प्रमाण ९३.४ टक्के देखभाल दुरूस्तीसाठी एकूण खर्च रू.६८.५१ प्रति टन ऊस, गाळप बंद कालावधीचे प्रमाण (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल ०.३६ टक्के राहिल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच वैयक्तिक पुरस्कारामध्ये संत तुकाराम कारखान्याचे पर्यावरण अधिकारी मनोज नायकवडी यांना ” सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी” पुरस्कार जाहीर झालेला आहे. एक लाख रूपये रोख व मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.