VP Music Academy : संगीत क्षेत्रात भारताचे नाव जागतिक पातळीवर उजळवणारा एक ऐतिहासिक क्षण व्हिपी म्युझिक अकॅडमीने (VP Music Academy) घडवून आणला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स संस्थेकडे सलग ९६ तासांत १,१११ गाणी सादर करण्याचा अनोखा विश्वविक्रम नोंदवण्यात आला असून, असा विक्रम करणारी म्युझिक अकॅडमी ही जगातील पहिलीच संगीत अकॅडमी ठरली आहे. या भव्य संगीत महोत्सवाचा २३ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता श्री गणेश मंत्राने श्रीगणेशा झाला. तब्बल चार दिवस आणि चार रात्री अखंडपणे सुरू राहिलेला हा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी सकाळी ११:११ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाला. प्रत्येक क्षणात संगीताची साधना, शिस्त आणि भक्ती यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. या विक्रमामध्ये १३ वर्षांपासून ते ७१ वर्षांपर्यंतच्या १११ गायकांनी सहभाग घेतला. वय, अनुभव आणि शैलीतील विविधता असूनही सर्व गायकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादरीकरण करत या विक्रमाला आकार दिला. मराठी व हिंदी सिनेगीतांचा समावेश या १,१११ गीतांमध्ये करण्यात आला होता. सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे आणि प्रशिता पांडे परीक्षक शेखर शिंदे व त्यांच्या पत्नी यांच्याकडून विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र स्वीकारताना या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे आणि प्रशिता पांडे यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वामुळे आणि संगीतविषयक शिस्तीमुळेच हा अवघड आणि आव्हानात्मक विक्रम शक्य झाला, असे सहभागी गायकांनी सांगितले. इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स संस्थेच्या वतीने शेखर शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी परीक्षक म्हणून संपूर्ण ९६ तास कार्यक्रमावर बारकाईने निरीक्षण ठेवले. प्रत्येक गाण्याची नोंद, वेळेची अचूकता आणि नियमांचे पालन याची काटेकोर तपासणी करण्यात आली. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर हा विश्वविक्रम अधिकृतरीत्या मान्य करण्यात आला. व्हिपी म्युझिक अकॅडमीचा हा विक्रम संगीताची साधना, सामूहिक मेहनत आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचा जागतिक गौरव असल्याच्या भावना पुण्याच्या संगीत क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत. हे पण वाचा : Shashikant Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे सूचक विधान