जिल्ह्यात दुपारनंतरच मतदानाचा टक्का वाढला

दुपारी तीनपर्यंत टक्केवारीची जवळपास पन्नाशी : उमेदवारांसह स्थानिक नेत्यांचा जीव भांड्यात
पुणे – जिल्ह्यात आंबेगाव, इंदापूर, बारामती मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत मतदानाची टक्केवारी 50 टक्के ओलांडली होती. या तीन मतदारसंघातच हे चित्र पाहायला मिळाले. इतर मतदारसंघात ही आकडेवारी 50 टक्क्यांच्या जवळपास येऊन पोहोचली होती. दुपार तीनपर्यंत मतदानाचा टक्का समाधानकारक स्थितीजवळ पोहोचला होता. त्यामुळे सायंकाळी सहापर्यंत या नऊ मतदारसंघात एकूण सरासरी 60 टक्क्यापर्यंत पोहाचण्याची आशा स्थानिक नेते, आखाड्यातील उमेदवारांना बळावली.
गेल्या तीन दिवसांपासून मतदानावर वादळी पावसाचे सावट घोंगावू लागले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार, अशी चिंता आदल्या दिवसांपासून स्थानिक नेते, कार्यकर्ते, उमेदवारांना सतावत होती. मात्र, सकाळी मतदानाचा धिम्या गतीने सुरू झालेला प्रवास अडखळत होता. तो सुमारे वीस टक्क्यापर्यंत सीमित होता. त्यानंतर दुपारी एकपर्यंत मतदानाचा टक्का 25 ते 40 टक्क्यांच्या आसपास पोहचला होता. त्यामुळे उमेदवारांसह स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. दुपारी एकनंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, नेत्यांनी मतदारांना केंद्रात जाण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचा परिणाम मतदान टक्केवारीवर झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सकाळी अकरापर्यंतची टक्केवारी ही वीस टक्क्यापर्यंत असताना कार्यकर्ते, स्थानिक नेते चिंताग्रस्त झाले होते. त्यानंतर पावसाने क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी सहापर्यंत मतदानाची टक्केवारी 50 टक्के ओलांडेल की नाही, अशी स्थिती आकडेवारीवरून दिसून येत होती.
दुपारी तीनपर्यंत नऊ विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी पुढीप्रमाणे- आंबेगाव- 52.54 टक्के, इंदापूर- 52.27 टक्के, बारामती- 52.02 टक्के, जुन्नर- 49.03 टक्के, दौंड- 49.02 टक्के, पुरंदर- हवेली- 46. 04 टक्के, भोर- 48. 76 टक्के, खेड- आळंदी- 48.53 टक्के, शिरूर- हवेली- 44. 86 टक्के इतकी होती. त्यामुळे शिरूर- हवेली मतदारसंघात टक्केवारीची संथगतीने वाटचाल सुरू होती. शिरूर- हवेली मतदारसंघात मतदारांमध्ये निरूउत्साह असल्याचे दिसून आले.
पावसाची उघडीप कोणाच्या पथ्यावर ?
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून वादळी पावसाने थैमान घातले होते. त्यातच जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून भरपावसातच प्रचाराचा धडाका लावला होता. इंदापूर, दौंड, शिरूर- हवेली, खेड- आळंदी, पुरंदर- हवेली मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढती अनेक ठिकाणी लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जुळवून आणलेल्या राजकीय गणितांवर पावसाचे पाणी फिरणार काय, याची चिंता उमेदवारांसह स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. त्यामुळे मतदानांचा टक्का वाढविण्याचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. हा मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.





