पिंपरी – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज रविवारी (दि. 26) मतदान होत आहे. सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जाणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 28 जणांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एका अपक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. पोटनिवडणुकीसाठी आज 87 मतदान केंद्रातील 510 बूथवर मतदान होणार आहे. या मतदार संघातील एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया भयमुक्त, निःपक्षपाती व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देऊन निवडणूक प्रतिष्ठेची केली. तर, महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. तीनही उमेदवारांनी जोरदार प्रचार केल्याने ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. या तीन प्रमुख उमेदवारांसह एकूण 28 जण आपले नशीब अजमावित आहेत.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने 40 प्रचारकांची फौज निवडणुकीत उतरविली होती. तर राष्ट्रवादीनेही आपल्या 20 प्रमुख स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवित जंगी प्रचार केला. तर राहुल कलाटे यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्या मदतीने किल्ला लढविला. त्यामुळे सुरुवातील सहज वाटणारी ही निवडणूक प्रचंड चुरशीची बनली आहे. शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या नंतर शनिवारी सर्वच प्रमुख उमेदवारांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गाठीभेटी घेत प्रयत्न सुरू होते.
राज्यातील सर्वात मोठ्या चिंचवड मतदार संघासाठी रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. महापालिका शाळांसह खासगी शाळांमधील 87 मतनान केंद्रातील 510 बूथवर निवडणूक विभागाकडून नागरिकांसाठी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदानासाठी खासगी आस्थापनांकडून सुट्टी
चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाने एक परिपत्रक जारी करून सर्व कॉर्पोरेट कंपन्या, संस्था आणि औद्योगिक आस्थापनांना उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 26) सशुल्क सुट्टी देण्याचे निर्देश दिले आहेत. मागील निवडणुकांमध्ये, मतदारांना सशुल्क रजा किंवा सूट देण्यात आली नव्हती. परिणामी अनेक व्यक्ती मतदान करू शकले नाहीत. पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी सुट्टी देण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, मतदारांना सशुल्क सुट्टी किंवा निवडणुकीदरम्यान कामाच्या वेळेत योग्य सवलत मिळण्याचा हक्क आहे. त्यानुसार सुट्टी देण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे अवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
सन 2014 आणि सन 2019 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होती. या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत 60 टक्क्याचा आकडा कधीच ओलांडला गेलेला नाही. सन 2014 साली झालेल्या लोकसभेसाठी 55.23 टक्के तर विधानसभेसाठी 56.30 टक्के मतदान झाले होते. सन 2019 साली झालेल्या लोकसभेसाठी 56.29 टक्के तर विधानसभेसाठी 53.59 टक्के इतकेच मतदान झाले होते. सध्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असल्याने टक्केवारी घटण्याचीच अधिक शक्यता आहे. यावेळच्या निवडणुकीतील चुरस आणि मोठा उत्साह लक्षात घेता गेल्या वेळेच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढणार की घटणार याबाबत निश्चित सांगता येत नसले तरी मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक यंत्रणेसह उमेदवारांसमोर आहे.
प्रशिक्षण अन् साहित्याचे वाटप
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक विभागाकडून कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे 3 हजार प्रशिक्षणार्थींना तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर मतदान विषयक ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध साहित्य मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांना वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता 111 कर्मचारी तर स्वीकृतीसाठी 148 कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प व्हिल चेअर, ब्रेल लिपीसह मतदान यंत्र, विशेष स्वयंसेवक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा, साईन लॅंग्वेज, दिव्यांगांकरिता वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, दिव्यांग व्यक्तींसाठी मोबाईल ऍपद्वारे देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच दिव्यांग मतदारांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्ष मतदानामध्ये त्याचा किती फायदा होतो ते पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मतदारांची संख्या
मतदार 5 लाख 68 हजार 954 मतदार
पुरुष 3 लाख
2 हजार 946
महिला 2 लाख
65 हजार 974
तृतीयपंथी 34
दिव्यांग 12 हजार 313
80 वर्षांवरील वयोवृद्ध 9 हजार 926
अनिवासी
भारतीय 331
सैनिक 168
यापैकी कोणतेही ओळखपत्र ठेवा सोबत
मतदार फोटो ओळखपत्र
आधारकार्ड, पॅनकार्ड
युनिक दिव्यांग कार्ड
सेवा ओळखपत्र
बॅंक, टपाल कार्यालयाचे फोटोसह पासबुक
आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
वाहन चालक परवाना
पारपत्र
एनपीआर अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड
निवृत्ती वेतन दस्तऐवज
संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्यांनी जारी केलेले ओळखपत्र
मनरेगा जॉब कार्ड