पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे स्ट्राँगरूम सील

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे तसेच टपाली मतपेट्या आज बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून कडेकोट बंदोबस्त असणारी ही स्ट्राँगरूम आज सील करण्यात आली.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सीआरपीएफचे सुभेदार दुर्गेश कुमार मीना तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 4 जून 2024 रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.
या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिंग हॉलच्या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करण्यात आला असून त्यामध्ये ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या कक्षाला केंद्रीय सुरक्षा दलासह महाराष्ट्र पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही यंत्रणेसह आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी मावळ लोकसभे अंतर्गत असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाकरीता 1632 बॅलेट युनिट, 544 कंट्रोल युनिट आणि 548 व्हीव्हीपॅट यंत्रे, कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी 1017 बॅलेट युनिट, 339 कंट्रोल युनिट आणि 345 व्हीव्हीपॅट यंत्रे, उरण विधानसभा मतदारसंघासाठी 1032 बॅलेट युनिट,
344 कंट्रोल युनिट आणि 346 व्हीव्हीपॅट यंत्रे, मावळ विधानसभा मतदारसंघासाठी 1170 बॅलेट युनिट, 390 कंट्रोल युनिट आणि 396 व्हीव्हीपॅट यंत्रे, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 1647 बॅलेट युनिट, 549 कंट्रोल युनिट आणि 556 व्हीव्हीपॅट यंत्रे, पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी 1200 बॅलेट युनिट, 400 कंट्रोल युनिट आणि 402 व्हीव्हीपॅट यंत्रे असे एकूण 7698 बॅलेट युनिट, 2566 कंट्रोल युनिट आणि 2593 व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली आहेत.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात वाहतूक
13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर या अंतर्गत येणार्या पनवेल, मावळ, उरण, कर्जत, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणी मतदान साहित्य जमा करण्यात आले.
त्या ठिकाणाहून कंटेनरमध्ये मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम यंत्रे आणि मतमोजणीसाठी आवश्यक इतर मतदान साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत बालेवाडी येथे आणण्यात आले. त्यानंतर मतदान यंत्रांसह सर्व साहित्य स्ट्राँग रूममध्ये ठेऊन ही रूम सील करण्यात आली.





