मतदार मोदी सरकारच्या दिखाऊ कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील- मोहन जोशी

पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील

पुणे: प्रदीर्घ सस्पेन्स संपवत कॉंग्रेसने अखेर पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करताना माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जोशी यांची लढत भाजपने उमेदवारी दिलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी होईल.

दरम्यान,आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा आत्मविश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने, पुणे लोकसभा मतदार संघासाठी, सांगोपांग विचार करून माझी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली, त्याबद्दल मी कॉंग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण आणि सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो.

प्रचंड आर्थिक ताकद, सत्तेची मगरूरी आणि मागील पाच वर्षातील गैरकारभाराला कंटाळलेले मतदार, मोदी सरकारच्या दिखाऊ, खोट्या आणि प्रचारकी कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील, असेही ते म्हणाले.

लोकसभेची ही निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने जीवन-मरण्याची आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने मागील पाच वर्षात ज्या एककल्ली, असंवेदनशिल आणि एकाधिकारशाही कारभार केला, त्यामुळे लोकशाही, संविधान, मूलभूत स्वातंत्र्य, या सारख्या शाश्वत मूल्यांच्या रक्षणाची जबाबदारी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्षांच्या आघाडीवर आली आहे. या विचारांच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठीच्या लढाईत, कॉंग्रेस पक्षाने माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोंपवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.