Nanded Election | राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आज विविध जिल्ह्यात मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. याचदरम्यान आता नांदेडच्या धर्माबाद येथे मतदारांना डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलवून मतदान करू नका, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितल्याचा आरोप होत आहे. जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा कार्यकर्ते करत होते अशी चर्चा सुरु आहे. Nanded Election | नेमकं काय घडलं ? धर्माबाद येथे पैसे देतो असे सांगत या मतदारांना बोलावून घेतले. मंगल कार्यालयात सर्वांना तुम्हाला चार वाजेपर्यंत पैसे देतो असे सांगत थांबवून ठेवले. मात्र सकाळपासून या मतदारांना थांबवून ठेवण्यात आले, ज्यावेळी माध्यमांना याबाबतची माहिती मिळाली, तेव्हा सर्वजण पैसे न देता पळून गेले, असा आरोप मतदारांनी केला आहे. कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ दुसरीकडे, अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर देखील गोंधळ झाल्याचं समोर आले आहे. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. आरोप करत असताना उपस्थित असणाऱ्या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाला आळा सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्रावर एक मतदार संशयास्पदरीत्या मतदानासाठी आल्याचे लक्षात आले. निवडणूक कर्मचाऱ्यांनी संबंधित मतदाराची चौकशी केली असता चौकशीत संबंधित व्यक्ती बनावट आधार कार्ड घेऊन मतदान करण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती आपल्या भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी आली होती, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकारामुळे सिन्नरमध्ये खळबळ उडाली आहे. ही बाब उघड झाल्याने बोगस मतदानाला आळा बसला आहे. हेही वाचा: कोकाटे प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दांत व्यक्त केला संताप; म्हणाल्या “दिल्लीत मला जो भेटत होता तो…”