मुंबई : राज आणि उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हा निवडणूक अधिका-यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मतदार यादीतील घोळ सातत्याने समोर येत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार यादीतील त्रुटींवर वारंवार बोट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची दोनवेळा भेट घेऊन पुराव्यासह तक्रारी मांडल्या होत्या.मुख्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिका-यांना मतदार यादीतील त्रुटींची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये एकाच मतदारसंघात एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी नोंदले गेले आहे का, याची तपासणी होईल. दोषी आढळणा-या अधिका-यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल दिवाळीमुळे पुढील आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो विरोधी पक्षाच्या नेत्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान, राज्यात 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहे. त्या दिशेने राज्य निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. दुबार मतदारांचे काय करणार असे प्रश्न महाविकास आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेत उपस्थित केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र मतदार याद्यांतील घोळाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवताच निवडणूक आयोगाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्र लिहून सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मांडलेले मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. तसेच मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती, 18 वर्षे पूर्ण होणा–या नव्या मतदारांची नोंदणीबाबतच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रासोबत मतदार यादीतील काही त्रुटींबाबत प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनाची प्रत येथे जोडली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याबाबत केलेल्या सूचना आवश्यक त्या योग्य निर्देशांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत असल्याचे चोक्कलिंगम यांनी या पत्रात म्हटले आहे.