प्रभात वृत्तसेवा पुणे – तब्बल नऊ वर्षांनी पुणेकर महापालिका निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षात आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान केलेल्या शेकडो पुणेकरांची नावे मतदार यादीतून गायब आहेत. त्यातच मतदार याद्यांच्या चुकीच्या विभाजनामुळे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात आली आहेत. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदारांची नावे पाच वेगवेगळ्या केंद्रांवर आली आहेत.त्यामुळे नावे शोधताना नाव आणि मतदान केंद्र शोधताना नागरिकांची चांगलीच दमछाक पाहायला मिळत आहे. प्रशासनाचा दावा फोल महापालिका प्रशासनाने महापालिका निवडणुकीसाठी शहरातील ९५ टक्के मतदारांना वोटर स्लिपचे वाटप केले असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात शहराच्या अनेक भागांत अद्यापही प्रशासनाच्या वोटर स्पिप पोहोचलेल्या नाहीत. त्यातच मतदारांना नाव शोधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाइल ऍप मध्येही नावे सापडत नसल्याने नागारिक हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक मतदारांची नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होती. त्यांनी मतदानही केले आहे. मात्र, प्रत्यक्षात आता महापालिका निवडणुकीसाठी त्यांची नावेच नाहीत. अनेक नागरिकांनी विधानसभेला ज्या प्रभागात मतदान केले आहे, त्य ऐवजी शेजारच्या अथवा शहराच्या इतर भागातील प्रभागात त्यांची नावे आली आहेत. त्यामुळे मतदार गोंधळून गेल्याचे चित्र असून, त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारांचे पत्तेही बदलले.. सदाशिव पेठेतील एका कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच मतदान केंद्रावर येणे अपेक्षित असताना पाच वेगवेगळ्या केंद्रांवर आली आहेत. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे या सर्वांचे नाव एकाच केंद्रावर येत असताना या निवडणुकीत मात्र सर्वांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर गेल्याने या कुटूंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व सदस्यांचा राहण्याचा पत्ता निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रावर आहे. मात्र, महापालिकेच्या मतदार यादीत या सर्वांचा पत्ता बदलला असून, वेगवेगळ्या ठिकाणी राहात असल्याची नोंद केल्याने सदाशिव पेठेतील परदेशी कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण कुटूंबाचे नावच गायब महात्मा सोसायटी राहणाऱ्या शुक्ल कुटुंबात तीन मतदार आहेत. हे मतदार वर्षभरापूर्वी डहाणूकर काॅलनीत रहायला असताना त्यांनी लोकसभा, तसेच विधानसभा मतदारासंघात मतदान केले आहे. घरचा पत्ता बदलल्यानंतर त्यांनी अद्याप त्याची नोंद केलेली नाही. त्यामुळे त्यांची नावे डहाणूकर काॅलनीतील जुन्या ठिकाणी येणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या संपूर्ण कुटुबीयांची नावेच मतदार यादीत नाहीत. त्यामुळे शुक्ल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.