कार्यकर्त्यांना कॉंग्रेससोबत पुन्हा जोडण्याचे ध्येय, अध्यक्षपदासाठी मला मत द्या : शशी थरूर

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षापासून लांब गेलेला कार्यकर्ता पुन्हा पक्षात परत आणायचा आहे. पक्षाला बळकट करून अमूलाग्र बदल करायचे आहेत, जेणेकरून राजकीय पारडे जड होऊन पुन्हा सत्तेत परत येऊ शकू, असा ठाम विश्वास व्यक्त करीत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पक्षात अमुलाग्र बदलांची गरज पुन्हा व्यक्त केली. मला कॉंग्रेसमध्ये अमुलाग्र बदल करायचे आहेत, जेणेकरून मतदार पुन्हा कॉंग्रेससोबत जोडले जातील. तुम्हालाही ते बदल हवे असतील तर अध्यक्षपदासाठी मला मत द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पक्षात बदल व्हावे अशी तुमची इच्छा आहे का? की तुम्ही आहे त्यावर समाधानी आहात? जर तुम्हाला वाटते की सर्व काही ठिक आहे, तर मला मत देऊ नका. कारण मला पक्षात असे बदल हवे आहेत, ज्यांच्यामुळे 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत आपल्याला साथ न देणारे मतदार कॉंग्रेससोबत जोडले जातील, असे ते यावेळी म्हणाले.
आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या पक्षात शत्रूत्वाची भावना नाही. खर्गे साहेब माझे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांच्यासोबत मिळून काम केले आहे. निवडणूक त्या दोन सहकाऱ्यांमध्ये आहे ज्यांची भावना आहे की पक्ष मजबूत करण्यासाठी कसे काम केले पाहिजे? असेही थरूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.



