ट्रम्प यांना भेटायला येताना सूट का घातला नाही? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष उत्तर देत म्हणाले…

Trump-Zelensky Meeting | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये पार पडलेली बैठक वादग्रस्त ठरली. युद्धविरामाच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये सर्वांसमोरच वाद झाल्याचे दिसून आले. मात्र, या बैठकीत झेलेन्सकी यांच्या कपड्याचीही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या प्रमुखांना भेटायला येताना झेलेन्सकी यांनी नेहमीप्रमाणे काळ्या रंगाचे स्वेट शर्ट घातले होते. यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
तुम्ही अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ऑफिसमध्ये बसला आहात, पण तरीही तुम्ही सूट का घातलला नाही? असा प्रश्न झेलेन्सकी यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर झेलेन्सकी यांनी सडेतोड उत्तर दिले.
प्रश्नाचे उत्तर देताना झेलेन्सकी म्हणाले की, ‘मी युद्धाच्या समाप्तीनंतरच सूट घालेन. कदाचित तुम्ही जो सूट घातलेला आहे, तसाच घालेन किंवा तुमच्या सूटपेक्षा चांगला सूट परिधान करेल किंवा कदाचित थोडा स्वस्त सूट घालेन.’ त्यांच्या या उत्तरामुळे बैठकीतील तणाव थोडा कमी झाला व सर्वांनाच हसू आले. तसेच, यावेळी ट्रम्प यांनी देखील झेलेन्सकींच्या कपड्यांचे कौतुक करत चांगले दिसत असल्याचे म्हटले.
त्याआधी ट्रम्प स्वतः झेलेन्सकी यांच्या स्वागतासाठी व्हाइट हाऊसच्या दरवाज्यावर उभे होते. यावेळीही ट्रम्प यांच्या कपड्यांचे कौतुक केले. तसेच, झेलेन्सकी ही युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून अनेकदा काळ्या रंगाच्या कपड्यातच दिसले आहे. याआधीही त्यांनी सूट न घातल्याबद्दल चर्चा रंगली होती.
दरम्यान, वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी व्हाउट हाऊसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, यावेळी झेलेन्सकी व ट्रम्प यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. शांतता करार व युद्धविरामाच्या मुद्यावरून बैठकीतच दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्यानंतर पत्रकार परिषद देखील रद्द करण्यात आली. तसेच, झेलेन्सकी यांनी व्हाइट हाऊसमधून बाहेर पडावे लागले.





