वेलिंग्टन, (न्यूझिलंड) – प्रशांत महासागरामध्ये टोंगा बेटाजवळ समुद्रातच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे आता समुद्रात प्रचंड लाटा उसळायला लागल्या आहेत. या त्सुनामी लाटांचा फटका किनाऱ्याच्या भागाला बसण्याच्या भीतीने किनाऱ्यावरील नागरिकांनी उंच भागांकडे पळ काढला आहे.
टोंगा या छोट्यासा देशावरील संवाद यंत्रणा फारशी मजबूत नसल्यामुळे तेथे प्रत्यक्ष किती हानी झाली आहे, हे समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडीओमध्ये अनेक नागरिक किनाऱ्यापासून दूर जात असल्याचे दिसत आहे. विशाल त्सुनामी लाटांच्या तडाख्यामुळे किनाऱ्याजवळील घरे आणि बोटीदेखील दूरवर उडवल्या गेल्या आहेत.
टोंगामधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. लाटा ओसरेपर्यंत काहीही मदत कार्य करता येणार नसल्यामुळे सध्या काहीही मदत केली जाऊ शकणार नाही. मात्र लाटा ओसरल्यानंतर मदतकार्य त्वरित सुरू केले जाईल, असे न्यूझिलंडच्या लष्कराने म्हटले आहे. टोंगाचे राजे टुपाऊ सहावे यांना समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेल्या राजवाड्यातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
टोंगाजवळच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे पाणी जोरात उसळल्याचे उपग्रहाच्या फोटोंमध्ये दिसून आले आहे. या त्सुनामी लाटांचा धोका संपूर्ण टोंगाला असल्याचे टोंगाच्या हवामान विभागाने म्हटले आहे. फिजी आणि सामोआ या जवळच्या बेटांनाही या त्सुनामी लाटांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर रहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
न्यूझिलंडलाही धोका
होंगा टोंगा होंगा ज्वालामुखीचा हा उद्रेक एका शृंखलेतील एक भाग आहे. शुक्रवारी सकाळी या ज्वालामुखीच्या उद्रेकाला सुरूवात झाली. त्यानंतर मोठा गडगडाट ऐकू येऊ लागला आणि आकाशात काळे धूर एकत्र येऊ लागले होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. ज्वालामुखीमुळे आकाशात 5 किलोमीटरपर्यंत धूर आणि राख फेकली जाऊ लागली. तर ज्वालामुखीतील गॅस 20 किमीपर्यंत पसरला जाऊ लागला होता. या ठिकाणापासून 2,300 किलोमीटर दूरवरच्या न्यूझिलंडलाही या ज्वालामुखीमुळे वादळाचा धोका निर्माण झाला आहे.