Vladimir Putin : पुतीन यांच्याकडूनच शांततेच्या वाटाघाटींना अडथळे; युक्रेन आणि युरोपने केला आरोप

कीव, (युक्रेन) : युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठीच्या प्रयत्नांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हेच अडथळा करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की आणि युरोपातल्या नेत्यांनी केला आहे. रशियाने आतापर्यंतच्या युद्धात युक्रेनच्या जेवढ्या भूमीवर कब्जा केला आहे, ती रशियासाठी सोडून देण्याला देखील या नेत्यांनी विरोध केला आहे.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियाच्या ताब्यात असलेली जमीन युक्रेनने सोडून द्यावी, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवले होते. युरोपातल्या ८ देशांच्या नेत्यांनी आणि युरोपीय संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देऊन ट्रम्प यांच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. युक्रेनला हे युद्ध जिंकण्यासाठी मदत व्हावी यासाठी विदेशात असलेली रशियाची अब्जावधी डॉलर (युरो) ची मालमत्ता गोठवली जावी.
यासाठी या नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अर्थात तसे करताना काही कायदेशीर अडचणी आणि परिणामांना सामोरे जावे लागू शकते, हे ध्यानात घेऊनही हा प्रस्ताव स्वीकारावा असे या नेत्यांनी म्हटले आहे. ट्रम्प या आठवड्यात हंगेरीमधील बुडापेस्ट येथे पुतीन यांना भेटणार आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय सीमांमध्ये बळजबरीने फेरबदल केले जाऊ नयेत, या तत्वावरच ही चर्चा केंद्रित रहायला हवी, यावर युरोपातल्या नेत्यांनी भर दिला आहे.
युक्रेन हे युद्ध जिंकू शकणार नाही, असे ट्रम्प पहिल्यापासून म्हणत होते. मात्र गेल्या महिन्यात त्यांनी या भूमिकेत बदल करून नाटोच्या मदतीने युक्रेनला युद्ध जिंकणे आणि आपली भूमी परत मिळवणे शक्य असल्याचे म्हटले होते. मात्र गेल्या आठवड्यात पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे. आता युक्रेनने हे युद्ध जिंकणे अशक्य असल्याचे ट्रम्प म्हणत आहेत.
रशियाच्या नव्या आक्रमणाचा धोका
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार जर युक्रेनची भूमी सोडून दिली तर रशियाकडून युक्रेनवर भविष्यात नवीन हल्ला केला जाऊ शकतो. हा धोका युक्रेन प्रमाणे युरोपातल्या अन्य देशांनाही आहे, असेही युरोपातल्या नेत्यांच्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. युक्रेन, ब्रिटन, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, नॉर्वे, पोलंड, डेन्मार्क आणि युरोपियन युनियन संघाच्या अधिकाऱ्यांचे हे विधान सूचक आहे.





