विविधा : मामा वरेरकर

माधव विद्वांस
तीन पिढ्यांचे नाटककार, कादंबरीकार, कोकणपुत्र भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 27 एप्रिल 1883 रोजी चिपळूण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण व रत्नागिरी येथे झाले. लहानपणी ते वडिलांबरोबर कोकणातील दशावतारी नाटकांना जायचे. त्यामुळे बालपणातच त्यांच्यावर नाटकांचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी “नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला होता. हे नाटक मंचावर आले नसले तरी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे एका नाटककाराची चाहूल लागली.
शालेय शिक्षण संपल्यावर ते लगेचच टपाल खात्यात नोकरीस लागले. कोकणात नाटकाचे वेड खूपच, त्यामुळे अनेक नाटक मंडळी तेथे येत असत. मामांनी अशातच कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी परिचय वाढवला. नाटकांचे निरीक्षण व अभ्यास ते करीत असत. त्यांनी अनेक पाश्चिमात्य नाटकांचाही अभ्यास केला. त्यांनी बंगालीचा अभ्यास केला व बंगाली नाटके भाषांतरित केली.
त्यांनी डॉक्टर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटायचे. त्यासाठी त्यांना वैद्यकीय शिक्षणाकरिता रत्नागिरीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवले. येथे त्यांचा डॉ. कीर्तिकर (सिव्हिल सर्जन) यांचेशी संपर्क आला. डॉ. कीर्तिकर साहित्यप्रेमी होते व त्यांचा साहित्यसंग्रह मोठा अन् दुर्मीळ होता. त्यामुळे मामांना साहित्याची व लेखनाची आवड निर्माण झाली.
\मामा वरेरकर म्हणतात, “कीर्तिकरांच्या मार्गदर्शनामुळे मला साहित्य निर्माण करता आले. त्यांच्यासारखा गुरू भेटला म्हणूनच मला साहित्य म्हणजे काय हे कळू लागले.’ पुढे मामांनी वैद्यकीयचा कोर्स सोडला. त्यानंतर 1899 ते 1919 पर्यंत मामांनी पोस्ट खात्यात नोकरी केली. नोकरीत असतानाच त्यांनी “कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले.
14 एप्रिल 1908 रोजी ते स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीने रंगभूमीवर आणले. या नाटकात गुजराथी पोषाखातील विष्णुपंत पागनीसांची राधेची भूमिका व त्यांच्या तोंडची गायिलेली गुजराथी चालीवरील नाट्यगीते यामुळे हे नाटक गुजराथी समाजाने मुंबईत उचलून धरले होते. सन 1916 मध्ये नानबा गोखले यांनी मामा वरेरकर यांचे “हाच मुलाचा बाप’ हे नाटक गाजवले.त्यांनी एकूण 37 नाटके, 6 नाटिका लिहिल्या.
शिवाय कथा-कादंबऱ्या आणि रहस्यकथाही लिहिल्या. प्रामुख्याने ललित कलादर्शन या नाट्यसंस्थेने मामांची बरीचशी नाटके रंगभूमीवर आणली व ती लोकप्रिय झाली. वर्ष 1959 मध्ये पद्मभूषण पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमी फेलोशिप प्राप्त झाली. अनेक सामाजिक प्रश्नांसंबंधी मामांनी सामाजिक नाटके लिहिली.
त्यातील “सोन्याचा कळस’, या नाटकामध्ये मालक-मजूर संघर्षाचे विदारक दर्शन घडविले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव देणारी “भूमिकन्या सीता’ नाटकातील सीता आणि ऊर्मिला ही पात्रेही उभी केली. मामांनी नाटक लिहिण्याबरोबरच आधुनिक रंगमंच, नेपथ्य इत्यादी नाट्यतंत्रांचा विशेष अभ्यास केला होता.
धुळे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले तसेच वर्ष 1938 मध्ये पुण्यात भरलेल्या 29व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. तसेच ते संसदेच्या राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदारही होते. त्यांचे 23 सप्टेंबर 1964 रोजी निधन झाले.





