नवी दिल्ली – भारतीय महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळावर अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती जाहीर केली आहे. या पदावरून संजय कुमार अग्रवाल 28 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्या अगोदरच नव्या अध्यक्षाचे निवड प्रक्रिया सुरू झाली होती. चतुर्वेदी हे भारतीय महसूल सेवेच्या 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते अप्रत्यक्ष कर मंडळावर सदस्य म्हणून काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या निवड समितीने जारी केलेल्या माहितीनुसार चतुर्वेदी लवकरच अप्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होतील. त्यांना अप्रत्यक्ष कर विभागाचा दीर्घ पल्ल्याचा अनुभव आहे. त्याचा लाभ या क्षेत्राला होईल अशी आशा व्क्त करण्यात आली आहे. भारताचे जीएसटी संकलन उत्तरोत्तर वाढत आहे. विशेष म्हणजे जीएसटी दरात कपात केल्यानंतरही ग्राहकांनी खरेदी वाढविल्यामुळे जीएसटी संकलनात वाढ झालेले आहे.