पुणे -पंढरीच्या विठुरायाचा गजर हा सातासमुद्रापार “न्यू जर्सी’पर्यंत पोहोचला असून, यंदा तेथे वारीची तयारी सुरू झाली आहे. पेशाने अभियंते असलेल्या तीन वारकऱ्यांनी तेथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधले असून, येत्या आषाढी एकादशीला ते भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.
“पंढरीचे सुख नाही त्रिभुवन…’ म्हणतात ते खोटे नाही. या विठुरायाची ओढ, भक्ती अगदी सातासमुद्रापार गेली तरी ती कमी होत नाही. त्याच ओढीने महाराष्ट्रातील तीन उद्योजक अभियंत्यांनी पुढाकार घेऊन तेथे विठ्ठल मंदिराची उभारणी केली आहे.
न्यू जर्सी येथे स्थायिक झालेले जामनेर तालुक्याचे सुपुत्र आणि युवा उद्योजक प्रवीण पाटील यांनी मूळचे मुंबईचे असलेले भालचंद्र कुलकर्णी आणि मूळचे पुण्याचे असलेले आनंद चौथाई या दोन मित्रांच्या सहकार्यातून “स्टिवसेंट अवे लिंधर्स्ट’ येथे विठ्ठल मंदिर साकारले आहे.
या मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची नुकतीच प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर 29 जून रोजी अमेरिकेत हा अनुपम सोहळा तेथील नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.तसेच या मंदिरात “ग्यानबा तुकाराम’चा जयघोष निनादणार आहे. यावर्षीच तीन एप्रिल रोजी शिकागो येथे तरुण उद्योजकांनी पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची उभारणी केली. त्यापाठोपाठ आता न्यू जर्सी येथे विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, भविष्यात जवळपास दहा एकर जागेवर मंदिर उभारणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोण आहेत प्रवीण पाटील
अमेरिकेत स्थायिक झालेले प्रवीण पाटील हे मूळचे सोनाळा (ता. जामनेर) येथील रहिवासी असून जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांचे पुत्र आहेत. सोनाली ग्रामस्थांनी सोनाळे गावी अवली बाबा यांचे मंदिर बांधले असून, त्याचे जे. डी. पाटील अध्यक्ष आहेत. धार्मिक वातावरणाचे संस्कार त्यांना घरातच आजोबापासूनच मिळाले त्यामुळे तोच वारसा पुढे नेत असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.
असे आहे मंदिर
अडीच फूट उंचीची विठ्ठल रखुमाईची विलोभनीय मूर्ती खास पंढरपूर येथून अमेरिकेत मागवण्यात आली आहे. या मंदिराबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.vitthalmandirus.org/ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी जनांनी या मंदिराला अगत्याने भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.