आम्ही जगायचं तरी कसं? दृष्टिहीन कलाकारांची उद्धव ठाकरे यांना आर्त हाक…

– गौरव मालक
(लेखक स्वत: दृष्टीहीन कलाकार आहेत)
सध्या covid-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं चित्र आहे यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे. देशासह राज्यात अनेक ठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या परिस्थितीचा सामना जे शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत ते कसातरी करतीलही परंतु दृष्टिहीन कलाकारांनी या काळात कसं जगायचं हा प्रश्न या कलाकारांवर आ वासून उभा आहे. हे कलाकार आधीच सुशिक्षित बेरोजगार आहेत. तरीसुद्धा आपल्या आलेल्या अपंगत्वावर मात करत संगीत कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या कलाकारांना कुठलेही कार्यक्रम मिळत नाहीत आणि उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलच साधन उपलब्ध नाही. मग अशात आम्ही जगायचं तरी कसं असा सवाल या कलाकारांनी उपस्थित केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथे राहणारे कलाकार धनंजय लोहोटे सांगतात, आम्ही सर्वप्रथम सुशिक्षित बेरोजगार आहोत तरीसुद्धा आम्ही संगीत कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करतो परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये संगीत कार्यक्रम पूर्णपणे बंद झालेले आहेत. त्यामुळे आमच्या समोर आम्ही कसं जगावं हा प्रश्न उभा आहे. शासन वेळोवेळी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे सांगते परंतु शासनाची कुठलीच मदत आज पर्यंत आमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी
अमरावती येथील कलाकार दत्तात्रय डावरे सांगतात, अमरावतीमध्ये संपूर्ण गोष्टी बंद आहेत सांगीतिक कार्यक्रम देखील बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला खूप त्रास होत आहे. माझ्या परिवारामध्ये मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे देखील दृष्टिहीन आहोत. शासनाने लवकरात लवकर या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अक्षय महल्ले सांगतात मी sound operating च काम करतो आणि माझ्या परिवारामध्ये देखील मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही दृष्टिहीन आहोत सध्या आम्हाला कुठलेही कार्यक्रम नसल्यामुळे आमची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्याच बरोबर मी दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असून सुद्धा आमच्या भागातील संबंधित प्रशासकीय अधिकारी मला टाळत आहेत. याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. अमित उघडे सांगतात मी तबला वादक म्हणून काम करतो परंतु सध्या मला कुठलेच कार्यक्रम नाहीत त्यामुळे काही दिवस मी मसाज करण्याचं काम केलं परंतु आता त्यासाठीही लोक घाबरतात. आता शासनाने याकडे लक्ष द्यावं.
वाशिम जिल्ह्यामध्ये तोच अनुभव आला. कलाकार संजय मसनकर सांगतात, आजची परिस्थिती अतिशय निंदनीय आहे. राजकीय आंदोलनं, होतात निवडणुका होतात मग संगीत कार्यक्रम का नाही? आमची परिस्थिती बेताची असतानासुद्धा आम्ही मागच्या लाटेमध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य केलं. परंतु आता सहकार्य करण्याची आमची क्षमता नाही. त्यामुळे मायबाप सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये.
नाशिक येथील कलाकार पुष्पराज पवार सांगतात, मी ‘ढोलकी झाली बोलकी’ या सह्याद्री उपग्रह वाहिनी वरील कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यंत पोहचलो. परंतु तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये मी अतिशय हताश झालो आहे. कारण आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या असताना मला त्या जबाबदाऱ्या पूर्ण करता येत नाहीत. शासनाने संगीत कार्यक्रम सुरू करून आम्हाला दिलासा द्यावा ही विनंती.
दृष्टिहीन बांधवांसाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथील प्राचार्य नवनाथ इंगोले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. नवनाथ इंगोले सांगतात, आमचा सुर संगीत नावाचा संच आहे. वर्षभरात या मंचाच्या माध्यमातून 100 पेक्षाही अधिक कार्यक्रम होतात आम्ही प्रत्येक कलाकाराला दर महिन्याला सहा हजारापर्यंत मदत करू शकतो. परंतु शासनाने सध्या संगीत कार्यक्रमांवर बंदी आणली असल्यामुळे या बांधवांना आम्हाला मदत करता येत नाही. त्यामुळे शासनाने संगीत कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करावेत.
खरंच मनात जिद्द आणि आपल्यात असलेल्या कर्तुत्वावर जगणाऱ्या या कलाकारांची ही अर्थहाक मुख्यमंत्र्यांनी ऐकून या कलाकारांच्या पंखांना बळ द्यावं हीच माफक अपेक्षा.
– गौरव मालक
(लेखक स्वत: दृष्टीहीन कलाकार आहेत)





