प्रभात वृत्तसेवा सातारा – साहित्यामधील अनुभवांना भौगोलिक मर्यादा नसतात. जवळच्या परिसराचा, भेटणाऱ्या माणसांचा, येणाऱ्या अनुभवांचा आरसा साहित्यामध्ये पाहवयाला मिळतो. जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांमधील जिवंत संवेदना टिपण्याचे कार्य लेखकाचे असते. गेली चार दशके मी तेच काम प्रामाणिकपणे करत आहे, त्यातूनच ही साहित्य निर्मिती होऊ शकली. लेखकाला जात नसते, लेखकाला धर्म असतो. तो धर्म माणुसकीचा असतो, असे मत साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशन यांच्यावतीने येथील शाहू कलामंदिरमध्ये विश्वकोश महामंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, मावळा फाउंडेशनचे चंद्रकांत बेबले, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ, डॉ. राजेंद्र माने, शिरीष चिटणीस इत्यादी व्यासपीठावर होते. विश्वास पुढे म्हणाले, ‘‘मराठी भाषा ही अनेक टप्प्यांतून विकसित झाली आहे. ती जशी वळवावी तशी वळते. लेखकाला जिथे जे उत्तम सापडेल ते त्याने वेचावे हा लेखकाचा धर्म आहे. ज्यांचे अनुभव मिळाले आणि ज्यांच्या उपस्थितीने आयुष्य समृद्ध झाले अशा सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांच्या घरांच्या उंबऱ्यावर माथा टेकवून मी साताऱ्यात आलो आहे.’’लेखक जागरूकपणे विषय व आशय शोधत असतो. ते अनुभव तो शब्दातून मांडत असतो. एखाद्या विषयाची वस्तुस्थिती पूर्णपणे मांडताना सामाजिक भानं बाळगावे लागते. सकस अनुभवांची स्पंदने अचूकरित्या टिपली तर उत्कृष्ट साहित्य निर्मिती होते, त्याचे भान बाळगल्यामुळेच आपल्याकडून सरस्वतीची गेली चार दशके सेवा घडल्याचे विश्वास पाटील यांनी नमूद केले. माझ्या प्रशासकीय कालखंडात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला नेहमीच बळ दिले. मुंबई जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना केवळ तीन दिवसांत कॅबिनेट नोट सादर करून शिर्डी विमानतळासाठी दीडशे कोटी रुपये मी मिळवले होते, अशी आठवण पाटील यांनी सांगितली. नागपूर येथे एका हॉटेलमध्ये खूप वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटल्याचेही आठवण त्यांनी आवर्जून नमूद केले.राजा दीक्षित म्हणाले, ‘‘विश्वास पाटील सकस साहित्य आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व आहे. साहित्य निर्मिती करताना त्याचा रसस्वाद देण्याकरता शब्द सामर्थ्य आणि सामाजिक अवधानं आवश्यक असते. ही दोन्ही अवधाने पाटील यांनी व्यवस्थित सांभळली आहेत. विश्वास पाटील यांची साताऱ्याच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीक्षित यांनी त्यांचे अभिनंदन केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दीक्षित यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा शाल, श्रीफळ, कंदी पेढ्यांचा हार व मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी सातारकरांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मान्यवरांचा सत्कार केला.