मुंबई : शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात तसेच यवतमाळ जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नांदेकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिंदेसेनेत नांदेकर यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे ते चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक होते. यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्राचे ते आमदार होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ डिसेंबर रोजी रुग्णालयात जाऊन विश्वास नांदेकर यांची भेट देखील घेतली होती. त्या वेळी त्यांनी नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून त्यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली होती.