विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म।।

Updated On:

“पंढरीची वारी’ ही विविध भाषा, संस्कृतीचा एकोपा जपणारी, बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती-जमातींना एकत्र आणणारी आपली चालतीबोलती, जिवंत अशी लोकधाराच होय! वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण “मी’पणा सोडूनच सहभागी होतो. गरीब-श्रीमंत, सामाजिक भेदभाव विसरून हरिनामाच्या गजरात तल्लीन होतो.

या लोकदैवताला विठ्ठल म्हणा…विठोबा म्हणा…किंवा पांडुरंग…”महाराष्ट्राच्या भक्‍तीभाव आणि लोकसंस्कृतीला एकत्र आणण्याचे आद्य प्रतीक’ अशी या विठुरायाची ओळख. त्याच्या भेटीला जाण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण “मी’ पणा सोडूनच सहभागी होतो. गरीब-श्रीमंत, सामाजिक भेदभाव विसरून हरिनामाच्या गजरात तल्लीन होतो.

विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।
आईकाजी तुम्ही भक्त भागवत।
कराल ते हित सत्य करा ।।

संत श्री तुकाराम महाराज सांगतात, “हे जग विष्णूमय असून इथे कुणाचाही जात, धर्म, पंथ, पक्ष, प्रांत, लिंग यावरून भेद करणे, हे अमंगळपणाचे लक्षण आहे. समतेच्या पायावर उभ्या असणाऱ्या भागवत धर्माच्या भक्तांनो सावधपणे मी जे सांगतो आहे ते ऐका आणि सत्यामध्येच हित असल्याने ते सत्य स्वीकारून आपले हित साधून घ्या. कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे हीच खरी ईश्‍वराची भक्ती आहे. समाजात परस्परांविषयी इतका बंधुभाव वाढला पाहिजे की, कोणत्याही अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीराला वेदना होतात. त्याचा भोग जीवाला भोगावा लागतो. तसं समाजातील कोणताही घटक संकटात असेल तर त्याची आच समाजातील प्रत्येक माणसाला लागली पाहिजे.’ हे तुकोबारायांनी रुजवलेलं एकोप्याचं सार आज प्रत्येक वारकरी जपतो आहे.

तुकोबारायांनी शिकवलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि एकोपा या मूल्यांचा जागर आजही वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळतो. या वारीमध्ये जात, धर्म, लिंगभेदाला स्थान नाही. समाजात आजही संतांनी रुजविलेल्या समतेच्या जागर होतो आहे. सामाजिक न्यायाची शिकवण दिली जाते आणि ती जोपासली जाते आहे. समाज जागरासाठी संतांनी साहित्यनिर्मिती केली, विचारांची पेरणी केली त्याचे प्रतिबिंब आजही शेकडो वर्षांनंतर वारीच्या रुपाने दिसून येते.

पंढरीच्या लोका नाही अभिमान।
पाया पडती जन एकमेकां।।

कपाळी टिळा, गळ्यात तुळशीची माळ, चुरमुरे-बत्ताशांचा गोपाळकाला सर्वांसोबत आनंदाने खातो, जाती-धर्माने कोण याची चौकशी न करता वारीची परंपरा सुरू झाली. वारीतले सगळे वारकरी आजही एकमेकांना “माऊली’ अशी हाक मारतात. वारीच्या निमित्ताने ते एकत्र येतात, एकत्र भोजन, एकत्र राहणं, आचारांची विचारांची देवाण-घेवाण होते. प्रपंचाचे वाद विसरून एकसंघ होतात.

पुढच्या वारीला पुन्हा एकत्र येतात, एकमेकांच्या संपर्कात राहतात, ओळख वाढवतात, वैर विसरून ऐक्‍याची भावना प्रेरित होते या वारी संकल्पनेतून. परस्परांच्या पायावर नतमस्तक होतात. हा नमस्कार तुमच्या-माझ्यातील देवत्वाला आहे, अशीच त्यांची श्रद्धा आहे.

देहू येथील इनामदार वाड्यातून निघालेली तुकोबारायांची पालखी अनगडशाहबाबा यांच्या दर्ग्यापर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते. त्यानंतर अभंग आरती केली जाते आणि तुकोबाराय पालखी रथातून पंढरीकडे निघतात. सामाजिक एकता, सलोखा, समता, बंधुभाव आणि एकात्मतेच्या पाऊलखुणांचे प्रतीक म्हणून ही प्रथा देहूत आजही जपली जाते.पंढरपुरात उभा असलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ आहे.

विठ्ठल हा लोकदेव…जो शांत, सात्विक भावमुद्रेचा, शस्त्रे टाकून कमरेवर हात ठेवलेला, पूजाविधी, भक्ती, प्रसाद, नैवेद्य आणि कुठलंही अवडंबर नसलेला देव आहे. अहिंसावादी, दया, क्षमा, शांती सांगणाऱ्या या विठुरायानं सर्वसामान्यांना आधार दिला. ज्याच्या पायावर डोकं ठेवावं, असे पाय भाबड्या भाविकाला दिसले. यातून त्यांचं आत्मभान जागं झालं. तो आजही तसाच आहे. आपण मात्र त्याच्याकडे जायला हवं. क्षणभर का होईना डोकं टेकवायला हवं. तरंच कदाचित आपलं आत्मभान जागृत होईल.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Tukaram Maharaj Dehu Palkh 2026 : तुकोबाराय निघाले विठ्ठल भेटीला...

2026-07-08 08:17:29

Tukaram Maharaj Dehu Palkh 2026 : तुकोबाराय निघाले विठ्ठल भेटीला...

Indrayani River: प्रशासनाला जमले नाही; पावसाने स्वच्छ केली इंद्रायणी.....

2026-07-08 08:09:10

Indrayani River: प्रशासनाला जमले नाही; पावसाने स्वच्छ केली इंद्रायणी.....

Alandi Flood News : इंद्रायणीला महापूर..! आळंदीत अडकलेल्या ४०८ वारकऱ्यांची सुरक्षित सुटका, मंदिर परिसरात पाणी

2026-07-06 16:20:56

Alandi Flood News : इंद्रायणीला महापूर..! आळंदीत अडकलेल्या ४०८ वारकऱ्यांची सुरक्षित सुटका, मंदिर परिसरात पाणी

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांनो... देहू-आळंदीला जाऊ नका.! पालखी सोहळ्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर...

2026-07-06 15:57:12

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांनो... देहू-आळंदीला जाऊ नका.! पालखी सोहळ्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर...

Alandi News : इंद्रायणीला पूर; आळंदीकडे येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

2026-07-06 12:11:37

Alandi News : इंद्रायणीला पूर; आळंदीकडे येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन