#AUSvIND : मालिका विजयात कोहलीचा वाटा

पुणे – ब्रिस्बेन कसोटीतील विजयासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. बदली कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे यासाठी सर्वत्र कौतुक होत असतानाच संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड व रवीचंद्रन अश्विन यांच्यातील ऑनलाइन संवादातून निराळाच खुलासा समोर आला आहे.
या सामन्यात फलंदाजीच्या क्रमातील तसेच गोलंदाजीतील बदलांबाबत नियमित कर्णधार विराट कोहली मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व रहाणे यांच्याशी संवाद साधत होता. त्याच्या सूचनांची योग्य अंमलबजावणी झाली व त्यामुळेच हा सामना भारताने जिंकला, असे मत राठोड यांनी व्यक्त केले. या संवादात भारतीय माध्यमांचे काही प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
हा सामना सुरू झाल्यावर कोहली सातत्याने संघ व्यवस्थापन व प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी संपर्क साधत होता. ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा सल्लावजा निर्णय कोहलीचाच होता व तो रहाणेसह संघ व्यवस्थापनानेही मान्य केला. पंतला या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत डावा-उजवा असे समीकरण कायम राखावे असे कोहलीचे मत होते व अखेर तेच यशस्वी ठरले. चेतेश्वर पुजारा व पंत यांनी डावा-उजवा समीकरण यशस्वी करून दाखवताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना योग्य दिशा व टप्पा राखता येणार नाही याची काळजी घेतली.
पंतने सिडनी कसोटीत 93 धावांची खेळी केल्यावर कोहलीचा त्याच्यावर विश्वास बसला व त्यानेच पंतला ब्रिस्बेन कसोटीत पाचव्या क्रमांकावर पाठवा असा सल्ला दिला. पंतनेही यावेळी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने या सामन्यात नाबाद 89 धावांची खेळी केली व सामना भारतीय संघाला जिंकून दिला. रहाणेचे नेतृत्व, कोहलीच्या सूचना व सल्ले व शास्त्री आणि राठोड यांच्यासह संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्यामुळेच हा ऐतिहासिक मालिका विजय भारतीय संघ मिळवू शकला, असेही या संवादातून समोर आले आहे. यावेळी अश्विननेही कोहली व रहाणे यांच्या सूचनांमुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखण्यात यश आल्याचे सांगितले.
इंग्लंडविरुद्धही योजना तयार
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा संघ ज्या पद्धतीने खेळला ते पाहून भारतीय संघाने एक योजना तयार केली आहे. आशियाई खेळपट्टीवर खेळताना अनेक परदेशी संघांना कठीण जाते. मात्र, या मालिकेत इंग्लंडने सरस खेळ केला, हाच धोक्याचा इशारा समजून भारतीय संघाने इंग्लंडच्या बेन स्टोक्स व ज्यो रूट यांच्यासाठी व्युहरचना तयार केली आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजांकडून या योजनेत शंभर टक्के योगदान मिळाले तर पाहुण्यांना ही कसोटी मालिकाच नव्हे, तर हा संपूर्ण दौराच आव्हानात्मक ठरेल, असेही संकेत राठोड यांनी दिले आहेत.





