भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याला रनमशीन म्हणून संबोधले जाते. मात्र, यंदाच्या मोसमातील त्याची कामगिरी पाहिली तर याच रनमशिनला गंज चढला आहे का? असा विचार मनात येतो. यंदाच्या संपूर्ण मोसमात त्याचे शतक झालेले नाही. अर्धशतके झाली आहेत, मात्र ती पण कोहली स्टाइल नव्हती. एकीकडे भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाज अशी ख्याती मिरवणारा कोहली एकेका धावेसाठी झगडताना दिसला की आपणच आश्चर्यचकित होतो. सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यांतीलव विक्रम मोडणारा हाच का तो कोहली असा प्रश्न निर्माण होतो. बांगलादेशसारख्या तशा दुबळ्या संघाविरुद्धही त्याला शतक साकारता आले नाही. आता तर गाठ न्युझीलंडशी आहे. त्यांचे गोलंदाज जागतिक दर्जाचे नाहीत. असे असताना देखील भारतीय फलंदाजंनी चक्क त्यांच्यासमोर पहिल्या कसोटीत नांगी टाकल्यावर हेच गोलंदाज जागतिक दर्जाचे वाटू लागले. हीच आपली खासियत आहे की जे गोलंदाज सामान्य असतात त्यांनाच आपल्या विकेट बहाल करायच्या व त्यांना असामान्य गोलंदाज ठरवायचे. अगदी अंजता मेंडिसपासून आपण हा कार्यक्रम पहात आहोत. ओरुर्के हा काही जागतिक दर्जाचा गोलंदाज नव्हे, परंतू भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मापासून सर्वच फलंदाजांनी त्याच्यासमोर नांगी टाकली. कोहलीबाबत बोलायचे झाले तर त्याला हाफ व्हॉली प्लेड करताना पाहावत नव्हते. ज्या अशा चेंडूवर लिलया षटकार खेचण्याची संधी जगातील कोणताही फलंदाज गमावणार नाही, ते चेंडू कोहली केवळ प्लेड करताना दिसला. असे जेव्हा चित्र दिसते तेव्हा तो फलंदाज भरात नाही हे सहज लक्षात येते. न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीला भोपळाही फोडता आळा नाही. दुसऱ्या डावात त्यानं 70 धावांची खेळी केली. त्यावेळी तो भरात येत असल्याचे वाटले, परंतू हे अर्धशतक झाल्यवर तो परतला. तेव्हा ज्या चेंडूवर तो बाद झाला त्यावर एकेकाळी कोहली चौकार सहज मारायचा. आता तो चेंडू खेळायचा की सोडायचा हे ठरवताना गोंधळात पडत आहे. भारतासाठी ही लक्षणे चांगली नाहीत, कारण पुण्यातील कसोटी भारताने गमावली तर आपला जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेत अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न मोडून जाईल. खेळपट्टीवरील भेगांनी कर्णधार रोहित शर्माला जसे फसवले तसेच कोहलीला देखिल फसवले. त्याला ऑन द राइज चेंडूंवर बाद होताना पाहिले की जीव कासावीस होतो. असले चेंडू तो मैदानात भिरकावून देत असे, आता त्याला काय झाले आहे तेच कळत नाही. IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहली शून्यावर बाद; नावावर नोंदवला गेला लाजिरवाणा विक्रम…. ‘रनमशिन’ला गंज चढला आहे का असा प्रश्नही मनात आल्याशिवाय राहात नाही. पुण्याच्या खेळपट्टीवर तो कसा खेळतो यावर त्याचे आगामी काळातील कसोटी संघातील स्थानही निश्चित होणार आहे. टी-20 मधून निवृत्ती घेतलेला कोहली आपले एकदिवसीय व कसोटी संघातील स्थान टीकवण्यात यशस्वी होतो का ? हे पुण्याच्या कसोटीतील निकालानंतर स्पष्ट होणार आहे. निवड समिती देखिल हेच पाहण्यासाठी उत्सुक असेल.