विराट कोहली ठरलाय ICCचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’; विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा!

आयसीसीने विराट कोहलीला ऑक्टोबर महिन्यासाठीचा ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारासाठी कोहलीसह झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही आयसीसीने नामांकन दिले होते. मात्र, शेवटी हा पुरस्कार विराट कोहलीने मिळवला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोहलीने फक्त ४ डावात फलंदाजी केली असून यामध्ये त्याने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद ८२ धावांची खेळी केली होती.
“भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामना व्हावा अशी माझी इच्छा”, शोएब अख्तरचं वक्तव्य!
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ अत्यंत अडचणीत असताना विराटने उत्कृष्ट कामगिरी केली होती. टीम इंडियाने ३१ धावांवरच ४ गडी गमावले होते. यानंतर विराटने मैदानावर तळ ठोकला आणि ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. विराटने त्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून सर्वांचीच मनं जिंकली होती.
टी-२० विश्वचषकबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये १२३ च्या सरासरीने आणि १३८.९८ च्या स्ट्राईक रेटने २४६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत ८२, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत ६२, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत ६४ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्यापासून दोन पावलं लांब आहे. मात्र यामागील काही आयसीसी स्पर्धांमधील भारताची कामगिरी पाहता, संघाला अपयशाला सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे मागे झालेल्या चुकांना रोहित सेना पुन्हा करणार नाही. भारताच्या फलंदाजीत सलामी जोडीने अजूनही संघाला हवी तशी सुरुवात करून दिलेली नाही. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये राहुल आणि रोहित पूर्णपणे दबावात खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सलामीला मोठी धावसंख्या करण्यात अपयश येत आहे.
A batting stalwart wins the ICC Men’s Player of the Month award for October after some sensational performances 🌟
Find out who he is 👇
— ICC (@ICC) November 7, 2022
भारतासाठी सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली चांगल्या लयीत असून गोलंदाजीतही भारतीय संघ मजबूत भासत आहे. भारतीय संघाचा सेमीफायनल सामना इंग्लंडशी १० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी इंग्लंडचे आव्हान कठीण असणार आहे. कारण स्पर्धेत इंग्लंडनेही चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर सामान्याच्या सुरुवातीला नाणेफेकीचा कौलही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.





