विरार : विरार येथे मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली, विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत एका बाजूला कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मलब्याखाली दबून माय-लेकीचा मृत्यू झाला असून १५ ते २० नागरिक जखमी झाले आहेत. ही इमारत जुनी असून दहा वर्षापूर्वी महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरी देखील या इमारतीमध्ये नागरिक राहत होते. मिळलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत इमारतीत राहणा-या जोयल कुटुंबातील एका वर्षीच्या चिमुरडीचा पहिलाच वाढदिवस होता. त्यानिमित्ताने परिसरातील मित्र परिवार सर्वजण एकत्रित घरी जमले होते. मात्र अचानक ही दुर्घटना घडली व दुर्घटनेत या वाढदिवसाच्या दिवशीच चिमुरडीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचसोबत तिच्या आईचाही मृत्यू झाला आहे. तर वडील ओमकार जोयल हे सध्या मलब्याखाली दबले गेले असल्याची भिती आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची पथके बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत ९ जणांना रेस्क्यू करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.