Virar Building Collapse News : विरार इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; बिल्डरसह 4 जणांचा अटक

वसई : विरार पूर्वेतील विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेत 17 जणांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक नित्तल साने (वय 48), भूखंड मालक परशुराम दळवी यांच्या दोन मुली शुभांगी भोईर (वय 38), संध्या पाटील (वय 35), तसेच मेंटेनन्स वसूल करणारे सुरेंद्र भोईर (वय 46) आणि मंगेश पाटील (वय 35) यांना अटक करण्यात आली आहे. वसई सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना 6 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा युनिट 3 कडे सोपवण्यात आला आहे.
दुर्घटनेचे स्वरूप
२६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटच्या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळला, ज्यामुळे शेजारील चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या दुर्घटनेत इमारतीचा मलबा चाळीवर कोसळल्याने 20 ते 25 जण मलब्याखाली दबले गेले. या अपार्टमेंटमध्ये एकूण 50 सदनिका असून, त्यापैकी सुमारे 12 सदनिका कोसळल्या. सूत्रांनुसार, 2008-09 मध्ये जमीन मालक परशुराम दळवी आणि विकासक नित्तल साने यांच्यात झालेल्या करारानुसार ही इमारत बांधण्यात आली होती.
या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये आरोही ओंकार जोवील (वय 24), उत्कर्षा जोवील (वय 1), लक्ष्मण किसकु सिंग (वय 26), दिनेश प्रकाश सकपाळ (वय 43), सुप्रिया निवळकर (वय 38), अर्णव निवळकर (वय 11), पार्वती सकपाळ (वय 60), दिपेश सोनी (वय 41), सचिन निवळकर (वय 40), हरिश सिंग बिष्ट (वय 34), सोनाली रुपेश तेजाम (वय 41), दिपक सिंग बोहरा (वय 25), कशिश पवन सहेनी (वय 35), शुभांगी पवन सहेनी (वय 40), गोविंद सिंग रावत (वय 28), ओंकार जोवील (वय 27), आणि रोहिणी चव्हाण (वय 37) यांचा समावेश आहे. दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
जखमींमध्ये प्रभावकर (वय 57), प्रमिला प्रभाकर शिंदे (वय 50), प्रेरणा शिंदे (वय 20), प्रदीप कदम (वय 40), जयश्री कदम (वय 33), मिताली परमार (वय 28), संजय स्वपंत सिंग (वय 24), मंथन शिंदे (वय 19), आणि विशाखा जोवील (वय 24) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वसई, नालासोपारा आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात तपास तीव्र केला असून, इमारतीच्या बांधकामातील त्रुटी आणि मेंटेनन्सच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित केले आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.





