मुंबई – एमएक्स प्लेयरच्या ‘तू जख्म है’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गँगस्टर विराज त्रेहान आणि काव्या ग्रेवाल यांची प्रेमकहाणी प्रेखसकांच्या भेटीला आली आहे. गश्मीर महाजनी विराजच्या भूमिकेत आहे तर डोनल बिश्त काव्याच्या भूमिकेत आहे. अनिरुद्ध राजडेकर आणि नोएल स्मिथ यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. दुसऱ्या सीझनचे एकूण 9 भाग आहेत, जे 23 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहेत.
वेब सीरिजच्या सीझन 2 च्या ट्रेलरमध्ये विराज आणि काव्या यांच्यात विपरित परिस्थितींविरुद्ध प्रेम होताना दिसत आहे. काव्याच्या सहवासात आल्यानंतर विराजच्या वागण्यात बदल होत आहेत आणि त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येत आहे, जो याआधी कोणीही पाहिला नव्हता. मात्र, काही लोकांना या दोघांची जवळीक आवडली नसल्याने ते कारस्थान रचत आहेत असं ट्रेलरवरून समजते.
गश्मीर हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. अर्जुन कपूरचा पानिपत हा गश्मीरचा मागील हिंदी चित्रपट आहे. त्याने टीव्हीवरही बराच काळ काम केले आहे. ‘तू जख्म है’चा दुसरा सीझन प्रेक्षकांसाठी मोठ्या सरप्राईझ पेक्षा कमी नाही, कारण यावेळी विराज आणि काव्याची केमिस्ट्री एका वेगळ्याच पातळीवर जाणार असल्याचे गश्मीर महाजनीने सांगितले.
गश्मीर आणि बिश्त व्यतिरिक्त या सिरीजमध्ये नेहल चुडासामा, परिणीता सेठ, जिनल जोशी, सचिन वर्मा, अपर्णा कुमार, उद्धव विज, सौरभ मान आणि अभिनव वर्मा हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या सिरीजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. लव्ह..ऍक्शन आणि रोमान्सची केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळणार आहे.