कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्ये करून वादात सापडलेल्या प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका झाली. मात्र, त्याला काळ्या फिल्मिंगच्या गाडीतून राजेशाही थाटात बाहेर काढल्याने कोल्हापूर पोलिसांवर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी पोलिस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. काय आहे प्रकरण? प्रशांत कोरटकरने छत्रपतींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली होती. त्याला अटक करून प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज जामिनावर सुटका होताच कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला. मात्र, सुटकेसाठी MH-08-AN-6776 क्रमांकाच्या काळ्या फिल्मिंग असलेल्या गाडीचा वापर झाल्याने कोल्हापूरकर चिडले. सामान्य नागरिकांच्या गाड्यांवर फिल्मिंगसाठी दंड ठोठावला जातो, पण कोरटकरसाठी विशेष व्यवस्था केल्याचा आरोप होत आहे. कोल्हापूर पोलिसांवर टीकास्त्र – कोरटकरला कोल्हापूरात न्यायालयात हजर करताना आणि सुटकेसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. पण याचवेळी माध्यमांच्या गाड्या अडवून आणि काळ्या फिल्मिंगच्या गाडीला परवानगी देऊन पोलिसांनी कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे. दिलीप देसाई यांनी याबाबत तक्रार दाखल करत म्हटले, “काळ्या काचा असलेली गाडी कळंबा कारागृहात कशी आली? सामान्य नागरिकांना तिथे वाहन नेण्यास मनाई आहे, मग कोरटकरसाठी ही विशेष व्यवस्था कोणी केली? मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या गाडीवर कारवाई का झाली नाही?” चौकशीची मागणी देसाई यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “पोलिसांनी कायद्याचे पालन न करणारी गाडी का सोडली? कोणाच्या सांगण्यावरून ही गाडी तिथे आणली गेली?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोल्हापूरात संतापाची लाट – प्रशांत कोरटकरच्या सुटकेसाठी पोलिसांनी केलेल्या या ‘व्हीआयपी’ व्यवस्थेमुळे कोल्हापूरकरांमध्ये नाराजी पसरली आहे. छत्रपतींचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला अशी विशेष व्यवस्था मिळणे नागरिकांना रुचलेले नाही. या प्रकरणात पोलिसांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.