आयझॉल – जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील झो समुदायाच्या लोकांना समर्थन व्यक्त करण्यासाठी सिव्हील सोसायटीच्या संघटनांनी मंगळवारी संपूर्ण मिझोराममध्ये निदर्शने केली.
मिझोरामच्या मिझोंचे मणिपूरच्या कुकी, तसेच कुकी-चिन्स आणि म्यानमारच्या चिन्स समुदायाशी जातीय संबंध आहेत. ते एकत्रितपणे झो म्हणून ओळखले जातात. सेंट्रल यंग मिझो असोसिएशन आणि मिझो झिरलाई पावल या प्रमुख संघटनांच्या नेतृत्वाखाली राज्याची राजधानी आयझॉलसह मिझोरामच्या विविध भागांमध्ये मोर्चे काढण्यात आले. मणिपुरच्या हिंसाचाराचा निषेध करत हजारो लोक फलक आणि पोस्टर्ससह रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटची कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. या मोर्चात एमएनएफचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. भाजप, कॉंग्रेस आणि झोराम पीपल्स मूव्हमेंट यांनी देखील एकता रॅलीच्या समर्थनार्थ त्यांची कार्यालये बंद ठेवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये विशेषत: संवेदनशील भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, गस्त आणि कडक दक्षता ठेवण्यात आली होती.