West Bengal Elections 2026 – प. बंगालमध्ये दिवसभर मोठ्या प्रमाणात मतदान झाले असले तरी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनांनी तणाव निर्माण झाला होता. लोकशाहीच्या या उत्सवाला राजकीय संघर्षाचे गालबोट लागले असून, भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे अनेक ठिकाणी तणाव शिगेला पोहोचला होता. यामुळे निवडणूक आयोगाकडे दिवसभरात तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंजमध्ये भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर आसनसोल दक्षिणच्या भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची काच फुटली. हिंसाचाराचे हे लोण केवळ एका पक्षापुरते मर्यादित राहिले नाही. नौडा येथे एजेयूपीचे प्रमुख हुमायून कबीर यांच्या ताफ्यावरही दगडफेक झाल्याने सुरक्षा दलांना हस्तक्षेप करावा लागला. बीरभूम आणि मालदा जिल्ह्यांत भाजपच्या पोलिंग एजंटना केंद्रातून बाहेर काढून मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने भाजपवर निवडणुकीत गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दिवसभरात निवडणूक आयोगाकडे सुमारे ५०० हून अधिक तक्रारी दाखल करून घेतल्या. एकट्या तृणमूल काँग्रेसने ७०० हून अधिक तक्रारी केल्या असून, त्यात ईव्हीएममधील बिघाड आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बीरभूममधील खोयरासोलमध्ये तर मतदारांनी असा आरोप केला की, त्यांनी तृणमूलला दिलेले मत भाजपला जात आहे, ज्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती.