उदयपूरमध्ये विद्यार्थ्यावरील चाकू हल्यानंतर उसळला हिंसाचार, अनेक वाहने पेटवली; कलम 144 लागू

उदयपूर: राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील सूरजपोल परिसरात शुक्रवारी दोन विद्यार्थ्यांमध्ये चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच संतप्त हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. यादरम्यान अनेक वाहनांची जाळपोळ करण्याच्या घटनाही घडल्या.
विद्यार्थ्यांच्या वादातून हल्ला –
शुक्रवारी उदयपूरच्या सूरजप्पोल पोलीस स्टेशन परिसरात दोन शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, चाकू हल्ला झाल्याची घटनाही समोर आली आहे. या चाकूच्या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सूरजपोल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी शालेय विद्यार्थी देवराजला तातडीने एमबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी विद्यार्थ्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
हिंदू संघटनांनी केली निदर्शने –
दुसरीकडे विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. काही वेळातच हिंदू संघटनांशी संबंधित हजारो कार्यकर्ते एमबी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी गेटवर पोहोचले. येथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल, पोलिस अधीक्षक योगेश गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक उमेश ओझा यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा एमबी हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
हिंदू संघटनांनी बाजार बंद पाडला –
माहिती मिळताच आमदार फुलसिंग मीना, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र श्रीमाळी, हिंदू जागरण मंचचे रविकांत त्रिपाठी आणि हिंदू संघटनांशी संबंधित मोठ्या संख्येने अधिकारीही रुग्णालयात पोहोचले. दुसरीकडे एमबी हॉस्पिटलमध्ये जमलेले हिंदू संघटनांचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या आवारातून बाहेर आले आणि चेतक चौकाजवळ पोहोचले, तिथे त्यांनी घोषणाबाजी करत चेतक चौकात उघडलेली दुकाने बंद केली. मात्र, पोलिसांनी बाजारपेठ बंद ठेवणाऱ्या तरुणांना समज देऊन वातावरण शांत केले.
अनेक वाहने जाळली –
या घटनेदरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी अनेक वाहनेही जाळली, ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. या प्रकरणाचा वाढता विरोध पाहता शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जखमी विद्यार्थ्यावर सर्वोत्कृष्ट डॉक्टरांचे पथक उपचार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.





