विनोद तावडे यांनी दिला बूथ मजबुतीचा मंत्र

धावत्या दौऱ्यात साताऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद

सातारा  – भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्‍ती झालेले राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी धावत्या दौऱ्यात सातारा येथे पदाधिकाऱ्यांशी थोडक्‍यात संवाद साधला. बूथ स्तरावर संपर्क अभियान राबवून पक्ष मजबुतीचा मंत्र त्यांनी दिला; परंतु त्यांच्या या धावत्या भेटीने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पश्‍चिम महाराष्ट्रात, विशेषत्वाने सातारा जिल्ह्यात भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले असतानाही तावडे यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचे यावरून स्पष्ट झाले.\

सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाताना तावडे हे सातारा येथील हॉटेल महेंद्र एक्‍झिक्‍युटिव्हमध्ये थोडा वेळ थांबले होते. तेथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सकाळी स्वागत केले. ते नियोजित वेळेपेक्षा विलंबाने आल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व माध्यमांच्या प्रतिनिधींना ताटकळावे लागले. तावडे यांनी स्वागताचा स्वीकार केल्यावर सातारा जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बूथ संपर्क अभियान चांगल्या पद्धतीने राबवून पक्ष मजबूत करण्याचा मंत्र पदाधिकाऱ्यांना दिला.

पदाधिकाऱ्यांशी फक्‍त 15 मिनिटे बोलून ते सांगलीकडे रवाना झाले. येत्या काही दिवसांत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली असताना, तावडे हे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या निवडणुकीबाबत कानमंत्र देतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्याबद्दल तावडे यांनी अवाक्षरही न काढल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निराशा झाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, सौ. मनीषा पांडे, स्वप्निल बोराटे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, शहराध्यक्ष सौ. रिना भणगे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे, सुनील काळेकर, सौ. आशा पंडित, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे, तालुकाध्यक्ष सुजित साबळे, शहराध्यक्ष विक्रम बोराटे, सुधीर काकडे, भीमराव लोखंडे, बंडा पवार, विवेक कदम उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.