Vinod Kumar Shukla : ज्येष्ठ कवी विनोद कुमार शुक्ल यांचे निधन

हिंदी साहित्याच्या आकाशातील एक तेजस्वी तारा कायमचा मावळला. प्रेमाच्या अनिश्चिततेवर बोलणारे, मानवी जीवनातील आनंद आणि हताशेचे सूक्ष्म चित्रण करणारे तथा ‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था…’ अशा कविता रचून धर्म, जात, पंथ आणि भेदभाव विसरून माणूस म्हणून एकमेकांच्या मदतीला धावून येण्याचा संदेश देणारे सुप्रसिद्ध कवी, लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.
प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना रायपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना साथ न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्य जगताची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. हिंदी साहित्याला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना अलिकडेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने साहित्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
विनोद कुमार शुक्ल कोण होते?
विनोद कुमार शुक्ल हे हिंदी साहित्य विश्वातील एक अनोखे आणि प्रभावशाली लेखक, कवी होते. त्यांची लेखणी साध्या भाषेत गहन मानवी संवेदना आणि जीवनाच्या सूक्ष्म बारकावे उलगडण्यासाठी ओळखली जाते. त्यांची कादंबरी ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ आजही वाचकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे झाला. ते छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये वास्तव्यास होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ते सतत लिहित होते. त्यांचे उच्च शिक्षण जबलपूर कृषी विद्यालयातून पूर्ण झाले. प्राध्यापक म्हणून अध्यापन करताना त्यांनी साहित्य सृजनाला वाहून घेतले. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये जादुई यथार्थवादाची झलक दिसते, ज्यात साध्या ग्रामीण जीवनातून गहन तत्त्वज्ञान उलगडले जाते.
१९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘लगभग जयहिंद’ प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांच्या लेखणीतून अनेक कादंबऱ्या आणि कविता संग्रह बाहेर पडले. ‘नौकर की कमीज’ (ज्यावर मणी कौल यांनी समान नावाची चित्रपटही बनवला), ‘खिलेगा तो देखेंगे’, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या त्यांच्या प्रमुख आणि अजरामर कादंबऱ्या आहेत. त्यांची साहित्यकृती भारताबरोबरच परदेशातही वाचली आणि प्रशंसित झाली.
प्रमुख कवितासंग्रह
– लगभग जयहिंद
– वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह
– सब कुछ होना बचा रहेगा
– अतिरिक्त नहीं
– कविता से लंबी कविता
– आकाश धरती को खटखटाता है
– पचास कविताएं
– कभी के बाद अभी
– कवि ने कहा – चुनी हुई कविताएं
त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, हताशा, आनंद आणि मानवी नातेसंबंधांचे सूक्ष्म चित्रण आहे, जे वाचकांना अंतर्मुख करतात.
मिळालेले प्रमुख पुरस्कार आणि सन्मान
– ज्ञानपीठ पुरस्कार (५९वा, २०२४-२५) – छत्तीसगडमधील पहिले आणि हिंदीतील १२वे लेखक म्हणून हा सर्वोच्च साहित्यिक सन्मान.
– साहित्य अकादमी पुरस्कार (१९९९, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ साठी).
– पेन/नाबोकोव पुरस्कार (२०२३, आंतरराष्ट्रीय साहित्यासाठी).
– दयावती मोदी कवि शेखर सन्मान.
– गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप.
– रजा पुरस्कार.
– हिंदी गौरव सम्मान.





