Tejaswini Pandit | अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडीत सध्या तिच्या ‘येक नंबर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने निर्मिती केलेला आणि अभिनय केलेला ‘येक नंबर’ चित्रपट 10 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनायक पुरुषोत्तम यानं पटकथा आणि संवाद लेखक म्हणून काम पाहिले आहे. त्याने या सिनेमाचा हिरो धैर्य घोलप आणि सिनेमाची निर्माती तेजस्विनी पंडित यांच्यासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
विनायकची पोस्ट
‘आज येक नंबर Zee5 वर प्रदर्शित होतोय. प्रत्येकाच्या घराघरात आज चित्रपट पोहोचत असताना, मला या २ माणसांविषयी बरेच दिवस लिहायचं होतं ती संधी मिळाली.. धैर्य, ज्याच्याशिवाय ह्या चित्रपटाची गोष्ट सुरूच होऊ शकत नाही आणि तेजस्विनी जिच्याशिवाय ह्या चित्रपटाची गोष्ट पूर्णच होऊ शकत नाही..
मी धैर्य ला गमतीत म्हणतो, तुझा जन्म स्टोरी रीपोस्ट करण्यासाठी नाही स्वतःची स्टोरी घडवण्यासाठी झालाय.. त्याने तेच केलं. त्याने स्वतःच स्वतःसाठी एक गोष्ट लिहिली. तेजस्विनी पंडित या धैर्य वर सगळ्यात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीला निर्माती म्हणून त्यात एक सिनेमा दिसला आणि सुरू झाली या “येक नंबर” सिनेमाची गोष्ट.
View this post on Instagram
धैर्य हा माझा बालपणीचा मित्र. म्हणजे मी लहान होतो, तो कधीच लहान नव्हता. त्याच्यात त्या वयातही आत्मविश्वास इतका ठासून भरला होता की ज्या माणसांच्या फक्त असण्यानेच मी भारावून जायचो त्यांच्यात ही तो उठून दिसायचा.. त्याचा ह्युमर, आत्मविश्वास, दिलखुलास स्वभाव, माणसांना आपलसं करून घेण्याची कला ह्या गोष्टींचा त्या वयात माझ्यावर नकळत खूप प्रभाव पडला. ह्या क्षेत्रात टिकून राहायचं असेल, लोकांनी आपली दखल घ्यावी असं वाटत असेल तर सतत मागे मागे गप्प गप्प राहून चालणार नाही हे मला जाणवलं आणि मी जाणीवपूर्वक काही बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात केली.
त्या बदलाचा दीर्घकालीन परिणाम मला गेल्या काही वर्षांमध्ये दिसला. त्यामुळे जेव्हा या सिनेमाच्या लिखाणासाठी मला विचारलं तेव्हा त्याच्याकडून नकळत मिळालेलं काहीतरी त्याला परत देण्याची “येक नंबर” संधी मला या निमित्ताने मिळाली. आणि मी ती पार पाडू शकलो ते ही तो सतत खंबीरपणे सोबत राहिला म्हणूनच.. धैर्य, I love you.‘
पुढे त्याने तेजस्विनीबद्दल देखील लिहिले आहे, ‘मैत्री कशी निभवावी याचं उदाहरण म्हणून मला ताई माहित होती. धैर्य कडूनच कायम तिच्याबद्दल ऐकत आलो होतो. पण ती कळली या सिनेमाच्या प्रोसेस मध्ये. दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप असतो जो जहाजाला दिशा दाखवतो आणि त्याच्या अंतिम मुक्कामावर नेऊन पोचवतो. पण अँकर ऑफ द शिप त्या किनाऱ्यावर पोहचलेलं जहाज वादळ, वारा, लाटा या सगळ्या संकटापासून सुरक्षित ठेवतो आणि त्याला बुडू देत नाही.
ते काम तिने खूप धाडसीपणे केलं. निर्माती म्हणून प्रत्येक डिपार्टमेंट विषयी आस्था, नियंत्रण आणि समर्पण काय असतं ते सगळ्यांनी पाहिलं. फिल्म पूर्ण होईपर्यंत सगळ्यांच्या पुढे उभं राहून नेतृत्व करणारी तेजस्विनी पंडित प्रीमियर ला सगळे सगळ्यांचं कौतुक करत आणि स्वीकारत असताना सगळ्यात मागे उभी होती. सलाम.. ह्या दोन माणसांना आणि यांच्या मैत्री ला ही “येक नंबर” फिल्म समर्पित,‘ असे विनायकने पोस्टमध्ये लिहिले आहे.
अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडीतच्या ‘येक नंबर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा :