मेढा, (प्रतिनिधी) – गावातील संसाधनांची उत्पादकता व पर्यायी रोजगार संधी वाढवून वनावरील अवलंबत्व कमी केल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी होऊन सहजीवन प्रस्थापित होणार असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील संरक्षित क्षेत्रालगतच्या गावांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन जन-वन विकास साधण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून गावे स्वयंपूर्ण बनविणार असल्याचे प्रतिपादन बामणोली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी केले. बामणोली वनपरिक्षेत्रातील अंबवडे (ता.जावली) येथे सार्वजनिक साहित्य वाटप तसेच आयोजित बैठकीत ते बोलत होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक मनिकंदा रामानुजम, उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक रविकांत डेंगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रातील सर्व गावांमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच स्थानिकांचे वनावरील अवलंबित्व पूर्णपणे कमी करून वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले. निसर्ग पर्यटनात स्थानिकांचा सहभाग महत्वाचा आहे. अंबवडे येथील निसर्ग पर्यटन संकुल आवश्यक ती दुरुस्ती करून लवकरच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे ही त्यांनी नमूद केले. यावेळी वनपाल संदीप पवार, वनरक्षक जयंत निकम, ग्रामसेवक समाधान जाधव, वनसमिती अध्यक्ष अक्षय गोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जन-वन विकास योजना गावातील जन, जल, जंगल, जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, स्थानिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणे, स्थानिकांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. बाठे यांनी सांगितले.