प्रभात वृत्तसेवा औंध – औंध येथे मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामध्ये सात शेळ्या व दोन रेडक या कुत्र्यानी मारून टाकले आहेत. औंध गावासह परिसरातील अनेक शेतामध्ये, रहदारीच्या मार्गांवर अनेक कुत्र्यांची टोळकी फिरत असल्याने नागरिक शेतकरी महिला तसेच लहान मुलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याबाबत औंध ग्रामपंचायतीने त्वरित या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मागील काही दिवसांपासून औंध गावातील अनेक भागात तसेच गावा बाहेरच्या वस्त्यांवर, शेतामध्ये भटक्या कुत्र्यांनी शेतकरी, महिला , लहान मुले यांच्या मध्ये भिंतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक ठिकाणी भटकी कुत्री टोळकी करून फिरत आहेत. त्यामध्ये औंध गावातील पेठ गल्ली, ग्रामपंचायत चौक, जुने एसटी स्टँड, कोलाटी वस्ती, केदार चौक, गोटे वाडी परिसर, हायस्कूल चौक, महात गल्ली ,साकार वस्ती परिसर, गणेश वाडी रोड, जायगाव रोड नांदोशी रोड तसेच औंध भागातील अनेक शिवारांमध्ये या भटक्या कुत्र्यानी सळो की पळो करून सोडले आहे. नुकत्याच एका कुत्र्याच्या टोळक्याने महादेव माकार या शेतकऱ्याच्या चार शेळ्या मारुन टाकल्या तसेच लिलाबाई भोसले यांच्या दोन शेळ्या, दाऊत शेख यांचे एक रेडकू आणि एक शेळी, दस्तगीर मुलाणी यांचे एक रेडकू मारुन टाकले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ महादेव माकार, प्रमोद गुळवे, सतीश भोसले, सुभाष थोरात, लक्ष्मण कोळी,अमीर खान,दाऊत शेख, शैलेश लावंड व ग्रामस्थांनी औंध ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.औंध ग्रामपंचायतीने उघड्यावर टाकणारे खाद्यपदार्थ पदार्थ, मांसाहारी पदार्थ, टाकाऊ वस्तु उघड्यावरती टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ, महिलांनी केली आहे.याबाबत योग्य ते पाऊल उचलून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.