सुधारित विकास आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

वडगाव मावळ : वडगाव शहर भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनवडगाव नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेला सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जिणा असल्याचा आरोप करीत विकास आराखड्यात बदल करण्याची मागणी वडगाव शहर भाजपाने केली आहे. याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव नगरपंचायतीचा सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. हा विकास आराखडा सामान्य जनतेवर अन्यायकारक असून धनदांडग्यांसाठी धार्जिना आहे. श्री पोटोबा देवस्थानच्या जमिनीवर तीन ठिकाणी आरक्षण टाकून सदर जागा बाधित केली आहे.
आजुबाजूच्या बांधकाम व्यावसायिकांच्या जागा तशाच ठेवून देवस्थानच्या जागा बाधित केल्या आहेत. जैन बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या तळ्याजवळील जैन स्थानकावरही आरक्षण दाखविण्यात आले आहे. जैन बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करून हे आरक्षण तत्काळ हटवावे.
वडगाव बाजारपेठेतील जुना पुणे मुंबई महामार्ग बाजारपेठेमध्ये पूर्व बाजूकडून वडगाव गावठाण हद्दीमध्ये पुढे वडगाव कोर्ट गेट नंबर १ पर्यंत १२ मीटर रूंदीचा असावा, तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील गावठाण हद्दीतील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर जवळील अंतर्गत रस्ता देखील ९ मीटर ऐवजी ६ मीटर करावा, ही मागणी असल्याचे निवेदनात नमूद आहे.





