satara | मोरघरच्या ग्रामसेवकाविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक
कुडाळ, (प्रतिनिधी)– मोरघर (ता. जावळी) येथील ग्रामसेवकाविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त नागरिकांनी केली त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.
डोंगराळ भागातील मोरघर गावामध्ये ग्रामसेवकाने चुकीच्या पद्धतीने काम करून पाच ते सहा वर्षांमध्ये विकास कामे अडकवली, वारंवार वरिष्ठांना तक्रारी करूनसुद्धा दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी गावात सभा घेतली.
मेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी सभेची दखल घेऊन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना सभेला जाण्यास सांगितले, सभा सुरू झाल्यावर नागरिकांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले.
ग्रामसेवक चुकीच्या पद्धतीने काम करत असून मोरघर गावामध्ये तो नको, या अधिकाऱ्याची त्वरित बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आमचं गाव छोट असलं तरी चांगल्या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणारा अधिकारी हवा, असे लोकांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ आक्रमक भूमिकेमध्ये होते. ग्रामस्थांचे काम असेल तर अधिकारी मात्र मी मेढ्यामध्ये बैठकीत आहे, मी बाहेर आहे अशी टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिक त्रासाला कंटाळले होते.
अखेर त्यांनी ही सभा घेतली होती. ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे अडकली आहेत, ग्रामसेवक प्रत्येक कामात अडथळा आणतो असे आरोप ग्रामस्थांनी केले.
गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे मेढा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरवसे यांनी सांगितले. सुरवसे यांनी ग्रामसेवक सतीश गायकवाड यांची चौकशी केली. त्यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या तक्रार अर्जांमधील मुद्द्यांबद्दल चर्चा करण्यात आली. तक्रार अर्जातील मुद्द्यांवर ग्रामसेवक सतीश गायकवाड यांनीही आपले मत नोंदवले आहे.





