Satara News : वडोली निळेश्वर येथील लाभार्थ्यांना अपात्र ठरवल्याचा ग्रामस्थांचा ग्रामसेविकेवर आरोप

यशवंतनगर : वडोली निळेश्वर (ता.कराड) येथील पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ग्रामसेविका पुष्पा कोळी जाणीवपूर्वक अपात्र ठरवत असल्याचा आरोप अरविंद डुबल व शंकर डुबल यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केला आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील टप्पा क्र. २ मधील पात्र लाभार्थीच्या प्रतीक्षा यादीतील एकूण २९ लाभार्थी अपात्र केले आहेत. ग्रामसेवकानी प्रत्यक्ष जाऊन घराची पाहणी करून घर कच्चे का पक्के हे खात्री करून घेणे गरजेचे असताना फक्त सातबारा उताऱ्यावरून ही घरकुले नामंजूर केली आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे.
दि.२६ जानेवारी रोजी घेण्यात आलेली ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर दि.६ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक २७ नुसार पक्के घर असल्याने अपात्र करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ही ग्रामसभाच झाली नसल्याचे अक्षय डुबल यांनी सांगितले.अक्षय डुबल यांच्या अर्जावरून गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांचे आदेशानुसार विस्तार अधिकारी सांख्यिकी सागर विनायक बोलके यांनी ३ मार्च रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यामध्ये या दोघांची घरे कच्ची असून घरकुलसाठी पात्र असल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्रामसेविका कोळी यांनी आमच्या घराची प्रत्यक्ष पाहणी न करताच पक्के घर दाखवून घरकुल योजनेत अपात्र केले. तसेच कोणत्याही प्रकारची यादी जाहीर केली नाही. कोळी या वारंवार गैरहजर असतात. उडवाउडवीची उत्तरे देतात. प्रशासनाने त्यांची पारदर्शी कामकाजासाठी नेमणूक केलेली असताना देखील त्यांच्याकडून सामान्य ग्रामस्थ व प्रशासन दोघांची दिशाभूल केली जात आहे.
-अक्षय अरविंद डुबल. ग्रामस्थ वडोली निळेश्वर.
खोटा ठराव दिल्याचा आरोप…
घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अपात्र केल्याच्या आरोपावरून वडोली निळेश्वर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ज्या ग्रामसभेत लाभार्थी अपात्रतेचा ठराव घेतला ती ग्रामसभा झालीच नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच अनुमोदक म्हणून अविनाश डुबल यांचे नाव आहे ते त्या दिवशी प्रयागराज येथे कुंभमेळ्यात असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. तसेच कोळी यांच्याकडे खोडजाईवाडीचा चार्ज होता. वडोली निळेश्वर ग्रामस्थांना उतारे तसेच इतर काही दाखले मिळविण्यासाठी कोळी यांच्याशी संपर्क केल्यास खोडजाईवाडीत असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र गेल्या दीड दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे खोडजाईवाडीचा चार्ज नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.





