विक्रम मिस्त्री देशाचे नवे परराष्ट्र सचिव; 15 जुलै रोजी स्वीकारणार कार्यभार

नवी दिल्ली : उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्री देशाचे नवे परराष्ट्र सचिव बनणार आहेत. चीनविषयक तज्ञ म्हणून ओळखले जाणारे मिस्री १५ जुलैला कार्यभार स्वीकारतील. विद्यमान परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांच्या जागी ५९ वर्षीय मिस्री यांची नियुक्ती करण्यात आली. ते भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) १९८९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे स्वीय सचिव म्हणून कार्य करण्याचा दुर्मिळ बहुमान त्यांना लाभला. भारत आणि चीनमधील संबंध अद्यापही पूर्णपणे सुरळित झालेले नाहीत. त्याशिवाय, इतरही परराष्ट्र धोरणविषयक आव्हानांवर देशाला कार्य करावे लागणार आहे. अशात मिस्री यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
त्यांनी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनण्याआधी २०१९ ते २०२१ या कालावधीत भारताचे चीनमधील राजदूत म्हणून कार्य केले. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात धुमश्चक्री झाल्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले. त्यावेळी दोन्ही देशांमधील चर्चेत मिस्री यांनी महत्वाची भूमिका निभावली. भारताचे स्पेन आणि म्यानमारमधील राजदूत म्हणूनही त्यांनी याआधी कार्य केले. तसेच, अमेरिका, पाकिस्तान, जर्मनी, श्रीलंका आदी देशांतील भारतीय दूतावासांमध्येही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.





