विक्रम मिस्रींच्या लेकीसंदर्भातही आक्षेपार्ह टीका; का होतायेतं ट्रोल? नेमकं प्रकरण काय?

Vikram Misri | ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेची प्रत्येक माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याकडून वेळोवेळी पत्रकार परिषदेद्वारे दिली जात होती. त्यानंतर 10 मे रोजी भारत-पाकिस्तान युद्धात शस्त्रविरामाची माहिती देताच विक्रम मिस्री यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.
इतकेच काय तर त्यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरले जात असल्याने विक्रम मिस्री यांनी आपलं ट्विटर अकाऊंट प्रोटेक्ट केलं आहे.
ट्रोल करण्याचे कारण काय आहे?
शस्त्रविरामाची घोषणा परराष्ट्र सचिव मिस्री यांनी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जोरदार प्रत्युत्तर देण्याची उघडपणे मागणी करणारे अनेक लोक शस्त्रविरामामुळे निराश झाले. यावरून विक्रम मिस्त्री व त्यांच्या मुलीला ट्रोल केले जाऊ लागले.
महिला आयोगाकडून दखल
दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी परिपत्रक जारी करत आवाहन केलं आहे. परराष्ट्र सचिव मिस्री यांच्या मुलीचे वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे गंभीर आणि बेजबाबदार कृत्य आहे. तसेच, हे गोपनीयतेच्या कायद्याचेही उल्लंघन करणारे असून त्यांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारे आहे.
विक्रम मिस्री यांच्यासारखे देशाच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर व्यक्तिगत टीका टिपण्णी करणे सहन केले जाणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांवर होत असलेल्या व्यक्तिगत टीका करणे नैतिकदृष्ट्याही चुकीचे आहे. आपण सर्वांनी सभ्यता आणि संयमित वर्तणूक दाखवली पाहिजे, असे महिला आयोगाने परिपत्रकात म्हटलं आहे.
अनेक नेत्यांचा मिस्रींना पाठिंबा
दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासह काही नेत्यांनी मिस्रींना पाठिंबा दर्शविला आहे. ‘एक्स’वर ओवैसी म्हणाले, “विक्रम मिस्री एक सभ्य, प्रामाणिक व मेहनती डिप्लोमॅट आहेत, जे आपल्या देशासाठी अथक मेहनत घेत आहेत. आपले नागरी सेवा अधिकारी हे एक्झिक्युटिव्हच्या अंतर्गत काम करतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह किंवा देश चालविणाऱ्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडून घेतल्या गेलेल्या निर्णयासाठी त्यांना दोषी ठरवले जाऊ नये.”
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत भाजप सरकार किंवा त्यांचे कोणतेही मंत्री त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पुढे आलेले नाहीत किंवा अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला नसल्याचे म्हंटले. तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एका मुलाखतीत ट्रोलिंगचा निषेध केला आणि भारत-पाकिस्तान संबंधांमधील सर्वांत कठीण टप्प्यांपैकी एक असणारा टप्पा ज्या पद्धतीने हाताळला याबद्दल मिस्री यांचे कौतुक केले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा प्रवास
- विक्रम मिस्री यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९६४ रोजी श्रीनगर येथे झाला.
- ते भारतीय परराष्ट्र सेवेतील १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
- त्यांनी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग व नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून काम केले.
- विक्रम मिस्रीयांनी परराष्ट्र विभागात पाकिस्तान डेस्कवर काम केले आहे. यादरम्यान ते अनेक मोठ्या ऑपरेशन्स आणि कारवायांचा भाग राहिले आहेत.
- यापूर्वी ते स्पेन, म्यानमार आणि चीनमध्ये भारताचे राजदूतही राहिले आहेत.
- जानेवारी २०२२ ते जून २०२४ पर्यंत मिस्री उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
- १५ जुलै २०२४ रोजी त्यांनी परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला. ते देशाचे ३५ वे परराष्ट्र सचिव आहेत.
हेही वाचा:
Buldhana Accident: बुलढाण्यात कार आणि ट्रकची जोरदार धडक; तिघांचा जागीच मृत्यू





