खंडकरी शेतकरी, कामगारांचा प्रश्न मार्गी लागणार – विखे पाटील

इंदापूर – खंडकरी शेतकरी बांधवांच्या भोगवटा वर्ग 2 जमिनीचे भोगवटा वर्ग 1 मध्ये विनाशुल्क रूपांतर करण्यासाठी सादर झालेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडून तातडीने मान्यता देण्यात येईल. त्यामुळे खंडकरी शेतकरी व कामगारांचा प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लागेल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिवेशनातील केलेल्या मागणीप्रमाणे मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी (दि. 3) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. विखे पाटील म्हणाले, एक एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप झाले होते. त्यामुळे एक एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रलंबित विषय आता 10 गुंठेपासून ते 1 एकरापर्यंत त्यांना जमीन देऊन तो विषय निकाली काढण्यात येईल.
अनेक वर्षे रखडलेला प्रश्न शासन स्तरावरून मार्गी लागेल. त्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये. या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी कळंब, रणगांव, वालचंदनगर, आनंदनगर, जंक्शनसह दहा ते बारा गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या जल जीवन मिशन योजना, शाळा इमारती, आरोग्य व शासकीय कार्यालये, घरकुले, मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीसाठी लागणारी जागा, गावठाण विस्तार वाढीसाठी लागणारी जमीन यासह इतर बाबींसाठी शेती महामंडळाची जागा मिळण्याबाबत मागणी केली.
या बैठकीवेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, राज्याचे अप्पर मुख्य सचिव राज गोपाल देवरा, राज्याचे वित्त व नियोजन सचिव विश्वजित माने, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माने, रत्नपुरी मळ्याचे तहसीलदार लंगोटे, खंडकरी प्रतिनिधी सुहास डोंबाळे पाटील, कामगार नेते युवराज रणवरे, अतुल सावंत, राहुल रणमोडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कामगारांना दोन गुंठे जागा देणार
आमदार भरणे यांनी केलेल्या मागणी संदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्यास मंजुरी घेऊन शासनाच्या पुढील धोरणात्मक निर्णयांसाठी विशेष अध्यादेश काढला जाईल. त्याचबरोबर शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्काच्या घराच्या जागेसाठी महिनाभरात मंत्रालयात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी यांची संयुक्त स्वतंत्र बैठक घेऊन कामगारांना 2 गुंठे तसेच घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना जागा देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती या बैठकीत विखे पाटील यांनी दिली.





