भाजपमधील मंत्र्यांना ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणणारे’ आज ठगांमध्ये जाऊन बसलेत – अजित पवार 

मुंबई: राज्यपालांनी अभिभाषणात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना दिली खरी. मात्र, महाराष्ट्रातील शहीद कुटुंबियांचे प्रश्न अजून जैसे थे तसेच आहेत, अशी खंत अविधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान व्यक्त केली. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली तरी अजूनही नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हा विचारप्रवाह थांबवला पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

आज राज्यात प्रचंड दुष्काळ असल्याने हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे चारा छावण्या सुरू ठेवण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समोर समस्यांचा मोठा डोंगर आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आधी हा समस्यांचा डोंगर जनतेसमोर मांडला. विखे पाटील यांनी ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणत फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना हिणवले होते. मात्र तेच विखे पाटील या ठगांमध्ये जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही, असा सणसणीत टोला पवार यांनी लगावला.

शिवसैनिकांना डावलून फडणवीस सरकारने जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिल्याने शिवसैनिकांवर अन्याय झालाय. शिवसैनिकांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. वटपौर्णिमेच्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण ज्यांना मंत्रिपद दिले आहे ते कधीही कुणाचाही हात धरु शकतात, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशारा पवार यांनी सरकारला दिला.

विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. ५ हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देखील देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केलेल्या आरोपांवर भाष्य करायला हवे, अशी सर्व विरोधी पक्षांची मागणी असल्याचे पवार म्हणाले.

तसेच भाजप सरकारच्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांना यावेळी वगळण्यात आले, त्याचे कारण काय? हे सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाहीत की भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नसल्याने त्यांना वगळण्यात आले? याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी पवार यांनी सभागृहात केली. नवनियुक्त १३ मंत्र्यांना फक्त काही महिने काम करायला मिळणार, त्यामुळे चांगले काम करा जनतेचे तीनतेरा वाजवू नका, असा टोलाही पवार यांनी लगावला.

त्याचप्रमाणे मोदी सरकारच्या नावाखाली फडणवीस सरकार काहीही करू पाहत आहे. बालभारतीच्या पुस्तकात नवी आकडेवारी सांगून नव्या पिढीचे वाटोळे करत आहेत, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. याशिवाय राज्याचे कामकाज समाधानकारक नाही चालत. बेरोजगारी वाढली आहे. सरकारी जागा रिक्त असूनही भरली जात नाही. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यासगळ्या परिस्थितीत सरकारने एकतर्फी काम करू नये आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी पवार यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×